साताऱ्यात पदोन्नती प्रक्रियेत टंकलेखन प्रमाणपत्रे बोगस

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील पदोन्नतीच्या प्रक्रियेत काही कर्मचाऱ्यांची टंकलेखनाची प्रमाणपत्रे बोगस असल्याचे महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत नोकरी व पदोन्नतीसाठी संगणक टायपिंग प्रमाणपत्र बंधनकारक असते. शासकीय नोकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना संगणक टायपिंग, मॅन्युअल टायपिंगच्या परीक्षा उत्तीर्ण होण्याची अट असते. कर्मचारी शासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येते. टायपिंग परीक्षेची प्रमाणपत्रे पडताळणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे पाठविण्यात येतात. सद्यःस्थितीत जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू आहे. त्यानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात येत आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी एमएससीआयटी टंकलेखन, संगणकाबाबतचे प्रमाणपत्र सादर केले. पहिल्या टप्प्यात सामान्य प्रशासन विभागाने 15 कर्मचाऱ्यांची, तर दुसऱ्या टप्प्यात 48 कर्मचाऱ्यांची 91 प्रमाणपत्रे तपासणीसाठी पाठवली होती. परिषदेकडून संबंधित प्रमाणपत्राकरील सीट नंबर व अन्य माहिती रजिस्टरमधील माहितीशी जुळते की नाही, याची शहनिशा केली असता, दोन्ही टप्प्यांत सुमारे 26 प्रमाणपत्रे अवैध, तर 78 प्रमाणपत्रे वैध आढळली असल्याची माहिती दिली होती.