अपमान झाल्याने नोकरी सोडली, आता होणार सनदी अधिकारी; वाचा या अधिकाऱ्याची प्रेरणादायी कहाणी…

असं म्हणतात अनुभव हा सगळ्यात मोठा गुरू आहे. आपल्याला आयुष्यात येणारे अनुभवच आपली पुढची दिशा ठरवत असतात. असंच काहीसं एका तरुणाबाबत झालं आहे. पोलीस कॉन्स्टेबल म्हणून नोकरी करत असताना झालेल्या अपमानानंतर प्रेरणा घेत एक तरुण चक्क यूपीएससी परीक्षा पास झाला आहे.

या तरुणाचं नाव उदय कृष्ण रेड्डी असं आहे. उदय कृष्ण रेड्डी हे 2013 ते 2018 या कालावधीत आंध्रप्रदेश पोलिसात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. 2018मध्ये एका वरिष्ठाने सुमारे 60 सहकाऱ्यांसमोर उदय यांचा अपमान केला. हा अपमान जिव्हारी लागल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. या अपमानामुळे क्षुब्ध झालेल्या रेड्डी यांनी उच्च पदस्थ अधिकारी होण्याचा निश्चय केला आणि तो 6 वर्षांनी पूर्णही केला.

पोलिसातील नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर रेड्डी यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. संपूर्ण लक्ष केंद्रीत करून त्यांनी ही परीक्षा दिली आणि 2023च्या परीक्षेत 780वा क्रमांक मिळवला आहे.

आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील सिंगरायकोंडा तालुक्यातल्या उल्लापलेम गावात रेड्डी यांचा जन्म झाला. लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचं निधन झालं. त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांना वाढवलं. त्यांना 2013मध्ये कॉन्स्टेबलची नोकरी मिळाली. पाच वर्ष नोकरी केल्यानंतर आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन जवळपास चार वेळा यूपीएससी परीक्षा दिल्यानंतर त्यांनी 780वा क्रमांक मिळवला.