भाजपचं बाहेरून घेतलेलं सगळंच बियाणं बोगस! उद्धव ठाकरेंचे फटकारे

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर उद्धव ठाकरे यांनी कडाडून टीका केली. मोदी जिथे जातात तिथे खोटं बोलतात. शेतकऱ्यांना अस्सल बियाणं मिळणार अशी थाप त्यांनी मारली होती. पण भाजपचं बाहेरून घेतलेलं सगळं बियाणं बोगस आहे, ते शेतकऱ्यांना अस्सल बियाणं काय देणार? अशा शब्दांत अर्धापूरमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि मिंध्यांवर फटकारे ओढले.

अर्धापूर येथे झालेल्या जनसंवाद सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या अंतर्गत नाराजीवर बोट ठेवलं. ते म्हणाले, दोन दिवसांपूर्वी इंडिया आघाडीची पहिली जाहीर सभा शिवतीर्थावर झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन शुभारंभ खूप चांगला झालेला आहे, आपण मैदानात उतरलो आहोत. ग्रामीण भागात शेतकरी समोर असतात, शहरी भागात बेरोजगार युवक समोर असतात. महिला तर सगळीकडेच आहेत. कोणताही वर्ग असा नाही, जो खुश आहे. अगदी भाजपला किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना जरी विचारलं तरी तेही आज भाजपमध्ये खुश नाहीत. एक बातमी मी मोबाईलवर पाहत होतो. गुजरातमधल्या भाजपच्या महिला अध्यक्षा, ज्या 38 वर्षं भाजपचं काम करत होत्या, त्यांनी आज भाजपचा राजीनामा दिला आहे. नाराजी सर्वत्र आहे, काही जण धाडस करतात. ज्यांच्यात धाडस नाही, ते भाजपमध्ये जातात. त्या ताईंनी जे म्हटलं की, भाजप हा डायनसोरससारखा आहे. यांच्या शेपटाला काही लावलं तर मेंदूपर्यंत पोहोचायला खूप वेळ लागतो. हे माझं नव्हे त्या ताईंचं वक्तव्य आहे, ज्या भाजपमध्ये 38 वर्षं काम करत होत्या, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

आज मी तुमच्या समोर एक आवाहन करायला आलो आहे. महाविकास आघाडीचं जागावाटप जवळपास झालेलं आहे. एकदोन दिवसांत त्याची अधिकृत घोषणा होईल. आज मी तुमच्यासमोर आहे, उद्या मी बुलढाण्याला जातोय, परवा सांगलीला जातोय असं सर्व महाराष्ट्रात मी फिरतोय. पण या जागावाटपामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवावं लागेल की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला चूक करून चालणार नाही. जो कुणी उमेदवार आपल्यासमोर असेल, मग तो शिवसेनेचा, काँग्रेसचा किंवा राष्ट्रवादीचा किंवा आणखी कुठल्या मित्रपक्षाचा असेल. पक्ष न पाहता हुकूमशहाला गाडायचं आहे, हुकूमशाही संपवायची आहे, म्हणून आपल्याला त्याला विजयी करावंच लागेल, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.

भाजपच्या ढोंगी हिंदुत्वावरही त्यांनी आसूड ओढले. ‘आपण काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचं सरकार चालवलं. अडीच वर्षं गेली आणि यांनी गद्दारी करून ते पाडलं. उद्धवजींनी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले. मी कुठेही हिंदुत्व सोडलेलं नाही, शिवसेनेचे, शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडलेले नाहीत. पण मुळात, भाजपमुळे जे आपण बदनाम होत होतो. कारण, हिंदुत्वात फरक आहे. शिवसेनाप्रमुख सांगायचे तसं, शिवसेनेचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. दुसऱ्या धर्माचा द्वेष करणारं हिंदुत्व आमचं नाही. आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे. त्याचा परिणाम असा झाला की भाजपला आपण सोडल्यानंतर अनेक देशप्रेमी, त्या मुस्लीमसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत, ख्रिश्चनही आहेत; ते म्हणाले आता तुम्ही शुद्ध झालात. हे तुमचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. त्यांनी धुमाकूळ घातला होता. मला भाजपला सांगायचंय की किती सत्तेचा हव्यास? सत्तेचा दुरुपयोग करून पैसा, त्या पैशातून सत्ता, त्यातून पुन्हा पैसा. जाऊ तिथे आणि मिळेल तिथे खाऊ ही भाडोत्री जनता पक्षाची नीती आहे.’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी घणाघात केला.

भाजप आणि मोदींच्या जुमलेबाजीलाही उद्धव ठाकरे सडकून काढले. ‘कार्यकर्त्यांनी मतदारसंघ आता पिंजून काढला पाहिजे. 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकीवेळचे भाजपचे जाहीरनामे आणि पंतप्रधान मोदींनी मारलेल्या थापा, या वाड्यावस्त्यांवरती जाऊन तिथल्या लोकांना विचारा की ही योजना मिळाली का? युवक, आदिवासी, महिला यांनाही विचारा. 2014 साली मोदी बोलले होते की त्यांचं सरकार आल्यानंतर दरवर्षी दोन कोटी रोजगार उपलब्ध करू. मग दोन कोटी रोजगारांच्या हिशोबाने दहा वर्षांत केले असते तर 20 कोटी लोकांना आजपर्यंत नोकऱ्या मिळाल्या असत्या. पंतप्रधानांच्या थापेमध्ये किती जणांना रोजगार मिळाला? कुठेच नाही. मोदी जिथे जातात तिथे खोटं बोलतात. इथे आलेल्या शेतकऱ्यांना विचारा की पीकविमा मिळाला का? आपत्ती काळातली मदत मिळाली का? मोदी म्हणाले होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करेन, झालं का? लागवडीचा खर्च वाढला का? बियाणं तरी अस्सल मिळतं का? अस्सल बियाणं भाजपमध्येच नाही तर शेतकऱ्यांना काय देणार? यांचं बियाणं सगळं बोगस आहे. सगळं बियाणं बाहेरून घेतलेलं आहे. कारण त्यांनाच असं कळलं आहे की, महाराष्ट्रात मतं हवी असतील तर मोदी या नावावर मतं मिळू शकत नाहीत, ठाकरे या नावावरच मतं मिळतात. म्हणून बाळासाहेबांचा फोटो चोरला. काही फरक पडत नाही. आज आणखी एक ठाकरे चोरायचा प्रयत्न करताहेत, तोही घेऊन जा. मी आणि माझी जनता मला पुरेशी आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.