शिवसेनेच्या सातबार्‍यावर गद्दारांचे नाव लिहिले! उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्ला

सध्या देशात हुकूमशाहीच्या विरोधात संतापाचा उद्रेक झाला आहे. संकटकाळात मदत करणार्‍या शिवसेनेच्या सातबार्‍यावर गद्दारांचे नाव लिहिण्याचे पाप भाजपने केले. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास सातबार्‍यावर उपर्‍यांचे नाव लिहिण्याची भीती शेतकरी उघड बोलून दाखवत आहेत, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्ला केला.

नांदेड मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भोकर येथे खास पत्रकार परिषद घेतली. भाजपच्या हुकूमशाहीत सर्वसामान्य जनतेची अतोनात होरपळ होत आहे. या राज्यात कोणीच सुखी नाही. महिला, तरुण, व्यापार्‍यांमध्ये प्रचंड आक्रोश आहे. शेतकर्‍यांना तर त्यांच्या सातबार्‍यावर कोणा उपर्‍याचे नाव भाजप लिहिल अशी भीती सतावत आहे. काही शेतकरी मला भेटले. ते म्हणाले, संकटकाळात साथ देणार्‍या शिवसेनेच्या सातबार्‍यावर गद्दारांचे नाव लिहिण्याचे पाप भाजपने केले. भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आमच्या सातबार्‍यावरही कोणा उपर्‍याची नाव लागेल. एवढेच काय तुम्हाला नकली शिवसेना म्हणतात तसे आम्हालाही नकली शेतकरी ठरवतील, अशी भीती वाटत असल्याचे या शेतकर्‍यांनी सांगितल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

सध्या चालू असलेल्या निवडणुकीत सुरतेत जादू झाली. भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली होती. गद्दार सुरतेत जाऊन लपले. सुरतेतून महाराष्ट्र लुटला जात आहे. देशात असे जादूचे प्रयोग सुरू आहेत. असेच वातावरण राहिल्यास आपले कसे होणार, अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाली असून, त्यावर उत्तर राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी हेच असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. संपूर्ण राज्यभरात महाविकास आघाडीचे वातावरण अतिशय चांगले असून, आम्ही संपूर्ण ४८ जागा जिंकणार, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

सर्वसामान्य वार्‍यावर, गद्दारांना कडेकोट सुरक्षा

भाजपने त्यांच्यासोबत असलेल्यांना झेडप्लस, वायप्लस सुरक्षा दिली आहे. सर्वसामान्य मात्र वार्‍यावर आहेत. राज्यात महिला असुरक्षित आहेत. अभिनेता सलमानखानच्या घरावर गोळीबार होतो. त्यांच्याच पक्षाचा आमदार गणपत गायकवाड पक्षात कोणीच ऐकत नसल्याने पोलीस ठाण्यात गोळीबार करतो. जनताच सुरक्षित नाही. पण, गद्दारांना मात्र कडेकोट सुरक्षा पुरवली जात आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. या सुरक्षेचा खर्च कोण करत आहे, असा सवालही त्यांनी केला.

नांदेडातील चिखल स्वच्छ करा

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जनतेने नांदेडमध्ये झालेला चिखल स्वच्छ करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. अशोक चव्हाण काँग्रेसमधून गेल्यामुळे नव्या चेहर्‍यांना संधी मिळत आहे. त्यांनी रस्ते अडवले होते. चव्हाणांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये चैतन्य आले आहे. ‘आदर्श’च्या प्रकरणात अशोक चव्हाणांनी शहिदांचा अपमान केला, असा आरोप भाजपने केला होता. आता त्याच भाजपच्या मांडीला मांडी लावून अशोक चव्हाण बसलेत. त्या फसवणुकीत भाजप सहभागी झाला आहे, असा स्पष्ट आरोप यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला. जनतेने हुकूमशाही वृत्तीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहावे, असेही ते म्हणाले.