हृदयद्रावक! आई-वडिलांच्या भितीने कुत्रा चावल्याचे लपवले, रेबीजमुळे अल्पवयीन मुलाचा मृत्यू

उत्तरप्रदेशातील गाझियाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. चौदा वर्षाच्या मुलाने आई-वडिलांच्या भितीने घरी कुत्रा चावल्याचे सांगितलेच नाही. दीड महिन्यानंतर त्या मुलाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गाझियाबादच्या विजयनगरमधील चरणसिंह को कॉलनीतील ही घटना आहे. सोमवारी 14 वर्षाच्या शाहवेजचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहवेजला दीड महिन्यांपूर्वी शेजारचा पाळीव कुत्रा चावला होता. मात्र आई-बाबा ओरडतील या भितीने त्याने घरात कोणालाच त्याबाबत सांगितले नाही. काही दिवस घरच्यांपासून लपवून ठेवल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. त्याच्या वागण्यात घरच्यांना बदल जाणवू लागला आणि तो आजारी दिसू लागला त्यावेळी घरच्यांना कळले.

शाहवेजला रेबिज झाला होता. 1 सप्टेंबर पासून त्याने खाणे-पिणे सोडले होते. त्यानंतर त्याचे आई-वडिल त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले. घरच्यांनी त्याला गाझियाबाद, दिल्ली आणि आसपासच्या अनेक रुग्णालयात मुलाला दाखवले. मात्र त्याच्यावर उपचार झाले नाहीत. अखेर त्याला बुलंदशहर येथे घेऊन गेले, तिथेही आयुर्वेदीक डॉक्टरांना दाखवले. सोमवारी जेव्हा बुलंदशहर घेऊन जात होते, तेव्हा रुग्णवाहिकेत त्याने प्राण सोडला. त्याच्या कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला असून पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे,