अभिषेकच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिसांवर दबाव

शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नसून पोलिसांवर प्रचंड दबाव असल्यामुळेच हे घडतेय. हत्येची घटना घडल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली होती. त्यावेळी गृहमंत्र्यांनी आम्हाला वेदना देणारे बेजबाबदार विधान करीत घटनेला वेगळे स्वरूप देण्याचे काम केले, असे गंभीर आरोप शिवसेनेचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केले. अभिषेक यांच्या हत्येच्या घटनेनंतर पहिल्यांदाच घोसाळकर कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नरिमन पॉइंट येथील ‘शिवालय’मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अभिषेक यांच्या पत्नी तेजस्वी यांनी पत्रकारांशी भावनिक संवाद साधला. माझ्या दोन मुलांचे भवितव्य, माझे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, सरकारला माझी विनंती आहे की, अभिषेक यांच्या हत्येची सखोल चौकशी करून लवकरात लवकर सत्य समोर आणावे आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी भावना तेजस्वी यांनी व्यक्त केली. पत्रकार परिषदेला शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, विलास पोतनीस, उपनेत्या विशाखा राऊत, माजी महापौर किशोरी पेडणेकर उपस्थित होते. तेजस्वी घोसाळकर यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त केली. 8 फेब्रुवारीला सायंकाळी अभिषेक यांची निर्घृण झाली. त्या घटनेला दीड महिना उलटत आला तरी हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही. सखोल तपासासाठी आम्ही जमा केलेली माहिती तपास यंत्रणा, पोलीस आयुक्तांना 28 फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेजसह सादर केली. हत्येच्या वेळी त्या ठिकाणी अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख व अज्ञात व्यक्तीचा वावर होता. याबाबत सखोल तपास करण्याची मागणी केली. त्याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. तसेच भादंवि कलम 120(ब) आणि कलम 34 अन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणीही पोलिसांनी मान्य केली नाही किंवा संपर्क केला नाही, अशी नाराजी तेजस्वी यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवली.

मंत्र्यांची बेजबाबदार वक्तव्ये वेदनादायी
अभिषेक यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासह उदय सामंत, छगन भुजबळ या मंत्र्यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्यांवर विनोद घोसाळकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मीसुद्धा विधान भवनात काम करणारा कार्यकर्ता आहे. या तिन्ही मंत्र्यांसोबत मी काम केलेले आहे. ते माझ्या कुटुंबाला ओळखतात. अशा वेळेला कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी किंवा गुह्याचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला नसताना त्यांनी बेजबाबदार वक्तव्ये केली. यावरूनच पोलीस यंत्रणेवर खूप मोठा दबाव असल्याचे दिसून येते. हत्या झाली त्यावेळी अमरेंद्र मिश्रा, मेहुल पारेख व आणखी एका अज्ञात व्यक्तीचा वावर होता. त्याबाबतचे फुटेज आम्ही जमवले आणि पोलिसांना दिले. विलास पोतनीस, अंबादास दानवे, अनिल परब यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतरही गृहमंत्र्यांनी घटनेवेळी तिसरा माणूस तेथे नव्हता, असे विधान केले. हत्येच्या घटनेला वेगळे स्वरूप देण्याचे काम गृहमंत्र्यांनी केले, असा आरोप विनोद घोसाळकर यांनी केला.

पोलीस घाबरताहेत; तेजस्वीला साधा फोन कॉल केला नाही
हत्येच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांना लेखी पत्र दिले, सीसीटीव्ही फुटेज जमवून दिले. प्रत्यक्ष भेटून सखोल तपासाची मागणी केली. मात्र हत्येच्या घटनेनंतर पोलिसांनी तेजस्वीला साधा पह्न कॉल करून तुमचे म्हणणे काय हेदेखील विचारले नाही. याचा अर्थ काय होतो? आम्ही तक्रारदार आहोत. आमच्या घरावर प्रसंग ओढवला असताना पोलिसांनी आमच्याकडे येण्याची किंवा आम्हाला बोलावण्याचीही तसदी घेतलेली नाही. पोलीस का घाबरताहेत, असा सवाल विनोद घोसाळकर यांनी केला.

निवडणुकीच्या तोंडावर आमच्या नगरसेवकांना अडकवण्याचे षड्यंत्र
मी मागील 40 वर्षे राजकारणात, शिवसेनेमध्ये आहे. माझी सून तेजस्वी माजी नगरसेविका आहे. अशा परिस्थितीत पोलीस आमच्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करताहेत. तसेच पोलिसांमार्फत आमच्या नगरसेवकांवर वेगवेगळय़ा पद्धतीने दबाव टाकण्याचे काम केले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून आमच्या लोकांना अडकवण्याचे षड्यंत्र आहे. यासाठी सत्ताधाऱयांकडून पोलिसांचा वापर केला जात असल्याची शंका आहे, असेही घोसाळकर यांनी नमूद केले.

कटात मेहुल पारेखच्या सहभागाचा दाट संशय
अभिषेक आणि मॉरिस या दोघांना मारणारा तिसरा कोणी होता का, याचा सखोल तपास झाला पाहिजे. कोणी सहभागी असेल तर ते सखोल चौकशीतून स्पष्ट होईल. मेहुल पारेख हा मॉरिसचे सर्व व्यवहार सांभाळायचा. घटनेच्या दोन तास आधी मेहुलने त्याच्या आईला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याचे कारण काय? आईला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तो फिरताना दिसतोय. यावरून मेहुल हा हत्येच्या कटात सहभागी होता असा आम्हाला दाट संशय वाटतोय, असा आरोप घोसाळकर यांनी केला.

तेजस्वी यांनाही मारण्याचा कट होता!
– तेजस्वी घोसाळकर यांनी हत्येच्या कटाबाबत धक्कादायक दावा केला. ज्या कार्यक्रमाला मॉरिसने अभिषेक यांना बोलावले, त्या कार्यक्रमाला मलाही घेऊन येण्यास सांगितले होते. त्यानुसार अभिषेक मला बोलले होते, मात्र मला उशीर झाला म्हणून अभिषेक यांनी मला दुसऱया कार्यक्रमाला जाण्यास सांगितले.

– घटनाक्रम पाहता मलाही मारण्याचा कट असावा. पण माझ्या दोन मुलांचे नशीब होते, त्यामुळे मी पोहोचले नाही. ही सर्व गंभीर वस्तुस्थिती असल्यामुळे आम्ही पोलिसांकडून तपास काढून सीबीआयकडे वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करणार आहोत, असे तेजस्वी यांनी सांगितले. कोर्टाने महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदवल्यानंतरही तपास योग्य दिशेने होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.