अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचं उल्लंघन; अडचणी वाढणार, राष्ट्रवादीकडून कोर्टात अर्ज

Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं अजित पवार गटाला चांगलंच जेरीस आणलं आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेल्या आचारसंहिता नियम उल्लंघनाच्या तक्रारी आयोगानं स्वीकारल्या आहेत. तर आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन न्यायालयाच्या निर्देशांचं कशाप्रकारे उल्लंघन सुरू आहे याकरता त्यांनी न्यायालयात पुन्हा धाव घेतली आहे. न्यायालयाच्या निर्देशांचं पालन न करणं हा न्यायालया अवमान ठरतो त्यामुळेच अजित पवार गटाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयानं जाहिरातीत निवडणूक चिन्हाच्या वापरासंदर्भात जे निर्णय दिले होते त्याचं पालन अजित पवार गटाकडून होत नसल्याचं या अर्जात म्हटलं आहे. पक्षाच्या जाहिरातीत घड्याळ चिन्ह वापरताना त्यासोबत प्रकरण न्यायप्रविष्ठ असं लिहिणं आवश्यक आहे. मात्र अजित पवार गडाकडून तसा उल्लेख केला जात नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आक्षेप घेतला आहे.

तर अजित पवार गटानं देखील एक अर्ज दाखल केल्याची माहिती मिळत असून सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वांमध्ये काही सूट द्यावी अशी मागणी या अर्जाद्वारे करण्यात आली आहे. मात्र या अर्जांवर सुनावणी होणार की नाही? किंवा सुनावणी कधी होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.