ठाण्यात मिंधे गटाचे बचत गटाच्या महिलांना पैसे वाटप; सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओने पर्दाफाश

ठाणे लोकसभा मतदारसंघातून सक्षम उमेदवार सापडत नसल्याने पुरती गोची झाली असतानाच ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मिंधे गटाने महिला बचत गटांना पैसे वाटल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. मिंधे गटाच्या पदाधिकारी मीनाक्षी शिंदे या स्वतः टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमात पैसे मोजत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा मतदारांना आमिष दाखवण्याचा प्रकार असून या प्रकरणी कसून चौकशी करून आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

बचत गटावर कोणत्याही राजकीय पक्षाची मालकी नसते. त्यातील महिला स्वबळावर उभ्या राहाव्यात यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बचत गटांना दरवर्षी अनुदान देण्यात येते. मात्र त्याची संपूर्ण प्रक्रिया ही महापालिकेच्या वतीने होत असते. हे अनुदान देण्याची जबाबदारीदेखील महापालिकेवरच आहे. विशेष म्हणजे कोणालाही रोख रक्कम दिली जात नाही. पण लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत टेंभी नाक्यावरील कार्यालयात बचत गटातील महिलांना बोलावून त्यांना पैसे दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बचत गटाचे अनुदान राजकीय पक्षांना देण्याचा अधिकार नसतानाही त्याचा रोकडा व्यवहार मिंधे गट कसाकाय करतो, असा प्रश्न सर्वसामान्य ठाणेकरांना पडला आहे.

टेंभीनाक्यावरील मिंध्यांच्या कार्यालयात बचत गटातील महिलांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मिंधे गटाच्या पदाधिकारी मीनाक्षी शिंदे यांनी सांगितले की, तुम्ही फक्त अनुदान घेण्यासाठी नगरसेवकांशी कनेक्ट असता, पण तुमचा कायम संपर्क असला पाहिजे. तरच तुम्हाला या सगळय़ा गोष्टी वेळेवर मिळतील. नगरसेवक तुम्हाला वारंवार बोलवतात, पण तुम्ही लक्ष देत नाही, असे सांगत मीनाक्षी शिंदे यांनी बचत गटातील महिलांचा नगरसेवकांनी व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करावा, असेही सांगितले.

कागदपत्रांची एक प्रिंट आम्हाला मुख्यमंत्र्यांना द्यावी लागते
बचत गटातील महिलांची बैठक महापालिकेचे अधिकारी पालिकेच्या कार्यालयात घेत असतात. मग मीनाक्षी शिंदे यांनी टेंभीनाक्यावरील मिंध्यांच्या कार्यालयात बैठक कशी घेतली, त्यांना कोणी अधिकार दिले, असा प्रश्नही यानिमित्ताने निर्माण झाला आहे. महापालिकेतदेखील सध्या प्रशासकीय राजवट आहे. या बैठकीत बोलताना त्या म्हणाल्या की, अनुदान देण्यापूर्वी काही गोष्टी आम्हाला टॅली कराव्या लागतात. कागदपत्रांची एक प्रिंट मुख्यमंत्र्यांना द्यावी लागते व एक आमच्याकडे असते. कारण ती एक जबाबदारी आहे. आर्थिक व्यवहार करीत असताना आमच्या नावाला कुठे कलंक लागू नये म्हणूनच तुमचे डिटेल्स सगळे हवेत, असे बचत गटातील महिलांना सांगण्यासही मीनाक्षी शिंदे विसरल्या नाहीत. हे सारे वक्तव्य व पैसे मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने अनेक तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.