विराटला पर्याय नाही! आगामी टी-20 वर्ल्ड कपसाठी कोहली सलामीवीराच्या भूमिकेत

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा आधारस्तंभ असलेल्या विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतल्यानंतर त्याच्या टी-20 वर्ल्ड कप समावेशाबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. काहींनी कोहली या वेगवान क्रिकेटसाठी कसा अयोग्य आहे, याची बोंब सुरू केली होती. मात्र आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडणारा हा कोहली अजूनही सर्व फॉरमॅटसाठी ‘विराट’ असल्याचे चित्र उभे राहिले आहे. त्यातच विराटला हिंदुस्थानी संघात पर्याय नसल्याचे निवड समितीला कळून चुकल्यामुळे टी-20 वर्ल्ड कपसाठी तो संघात असणार, हेसुद्धा निश्चित झालेय. त्याचबरोबर तो कर्णधार रोहित शर्मासह सलामीला उतरू शकतो, असेही संकेत निवड समितीकडून मिळाले आहेत.

यंदाची आयपीएल टी-20 वर्ल्ड कप ट्रायल असल्यामुळे ‘जो खेलेगा, वही अमेरिका चलेगा’ याचे संकेत सर्वांना मिळाले आहेत. जसजशी स्पर्धा जवळ येतेय तसतशी इच्छुक जोरदार कामगिरी करत आहेत. त्यामुळे पुढील दोन आठवडय़ांत नेमका कुणाचा पत्ता कट होईल हे सांगता येत नाही. सर्वप्रथम विराटबद्दल निर्माण केलेली साशंकता त्याच्या फलंदाजीने दूर केल्यामुळे सूर हरवलेल्या फलंदाजांची आता धाकधूक वाढली आहे. अशा स्थितीत यशस्वी जैसवालचे संघातील स्थान डळमळीत होऊ शकते. या आयपीएल मोसमात धावांच्या बाबतीत अयशस्वी ठरल्यामुळे त्याच्या बॅटमधून धावांच्या वर्षावाची सारेच वाट पाहात आहेत. मात्र शुबमन गिलने आपले स्थान कायम राखण्यासाठी आपला खेळ दाखवला आहे. सर्वात विशेष म्हणजे संजू सॅमसनच्या फलंदाजीनेही निवड समितीला हादरवले आहे. त्याला संघात बसवण्यासाठीही निवड समितीला तारेवरची कसरत करावी लागणार असल्याचे दिसतेय. वेगवान गोलंदाजीत जसप्रीत बुमराच्या जोडीला कोण असेल याचा शोध सुरू आहे. अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज आणि आवेश खान हे शर्यतीत आहेत. 15 खेळाडूंपैकी 8 खेळाडू पक्के आहेत. आता फक्त 7 खेळाडूंची निवड बाकी आहे. दावेदार खूप आहेत, त्यामुळे संघ निवडीची शर्यत कोण जिंकतो, हे पाहण्यासाठी आपल्याला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

आठ खेळाडूंचे स्थान पक्के

हिंदुस्थानी संघातील खेळाडूंची कामगिरी पाहाता रोहित शर्मा, विराट कोहली, के. एल. राहुल, ऋषभ पंत, शुबमन गिल, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा या आठ जणांचे स्थान शंभर टक्के निश्चित मानले जात आहे. त्यामुळे फलंदाजांमध्ये यशस्वी जैसवाल, सूर्यकुमार यादव, शिवम दुबेपैकी कुणाची निवड होऊ शकते याबाबत साशंकता आहे. हार्दिक पंडय़ाचे कर्णधार आणि अष्टपैलू म्हणून आलेले अपयश त्याच्या निवडीबाबत अडथळे निर्माण करू लागले आहेत. फिरकीवीर म्हणून कुलदीपच्या साथीला युझवेंद्र चहलचे नाव जोडले जात आहे,