विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळय़ात सरकारला कुटुंबीयांचा विसर

तमाशासम्राज्ञी पै. विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्य सरकारला नारायणगावकर कुटुंबीयांचा विसर पडल्याचे आज दिसून आले आहे. या सोहळ्यासाठी नारायणगावकर कुटुंबीयांना साधे निमंत्रण पाठवण्याचे सौजन्य राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दाखवले नाही. या प्रकाराबाद्दल या कुटुंबीयाने पत्रक प्रसिद्ध करून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

तमाशा क्षेत्रात योगदान देणाऱया ज्येष्ठ तमाशा कलावंतांना दरवर्षी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत पै. विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. पाच दिवस पारंपरिक तमाशा महोत्सव आयोजित करून त्याच महोत्सवात हा पुरस्कार वितरण केले जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने लोककलावंत, लोककलेचे अभ्यासक, तमाशा रसिक एकत्र येऊन सध्या कालबाह्य होत असलेल्या तमाशा कलेवर चर्चा करतात. मात्र या वर्षी सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ही परंपराही खंडित केली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज सायंकाळी विविध पुरस्कार वितरण सोहळा आयोजित होता. या पुरस्कार वितरण सोहळ्यात 2021 चा पै. विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हिराबाई कांबळे-पाचेगावकर आणि 2022 चा पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत अशोक पेठकर यांना प्रदान केला.

सांस्कृतिक कार्य संचालनालय दरवर्षी पै. विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याला त्यांच्या कुटुंबियांना सन्मानाने केले जाते. या सोहळ्याला  त्यांच्या कुटुंबियांचा एक तरी प्रतिनिधी उपस्थित राहतो. मात्र यावर्षी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिकाऱयांना निमंत्रण पाठवले नाही. त्यामुळे नारायणगावकर यांच्या कुटुंबातील मोहित यांनी पत्रक प्रसिद्ध करून नाराजी व्यक्त केली. त्यानंतर सांस्कृतिक कार्य संचलनालायाच्या एका अधिकाऱयाला खडबडून जाग आली आणि त्यांनी पै. विठाबाई नारायणगावकर यांचे चिरंजीव पैलास यांना पह्न करून आज सायंकाळी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. पण आयत्यावेळेच्या या निमंत्रणामुळे सोहळ्याला उपस्थित राहाणे कुटुंबीयांना शक्य झाले नाही.