भाजपने गणेश नाईकांना बनवले ‘पालिका लिमिटेड’; देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही ठोस आश्वासन न देता समजूत काढली

राष्ट्रवादीमध्ये असताना पालकमंत्री, खासदार, दोन आमदार, महापौर ही पदे घरात ठेवणारे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना भाजपने फक्त नवी मुंबई महापालिका लिमिटेड बनवले आहे. मिंधे गटाने नरेश म्हस्के यांना ठाणे लोकसभेची उमदेवारी दिल्यानंतर नाईकांची नाराजी उफाळून आली होती. संतापलेल्या नाईकांना आणि त्यांच्या समर्थकांना शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी नाईक यांची भेट घेतली. नवी मुंबई महापालिका काल तुमचीच होती, आजही तुमचीच आहे, उद्याही तुमचीच राहील यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे आश्वासन देऊन फडणवीस निघून गेले.

राष्ट्रवादीच्या काळात गणेश नाईक यांचा एखाद्या सम्राटाप्रमाणे थाट होता. मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांच्या या साम्राज्याला उतरती कळा लागली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार संजीव नाईक यांना प्रचार सुरू करण्यास सांगितले होते. मात्र ऐनवेळी मिंधे गटाने नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर केली आणि नाईक व त्यांच्या समर्थकांचा संताप उफाळून आला. क्रिस्टल हाऊसमधील मेळाव्यात नाईक समर्थकांनी म्हस्के यांच्यासमोरच त्यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला. त्यामुळे म्हस्के यांना त्या ठिकाणाहून अक्षरशः पळ काढावा लागला नाईकांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी सायंकाळी क्रिस्टल हाऊसमध्ये आले. मात्र त्यांनी आमदारकी आणि खासदारकीवर कोणतेही भाष्य केले नाही. नवी मुंबई महापालिकेवर नाईक यांचे गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व आहे. त्यावर मात्र फडणवीस यांनी भाष्य केले. नवी मुंबई महापालिका काल तुमचीच होती, आजही तुमचीच आहे आणि उद्याही तुमचीच राहील, यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असे आश्वासन फडणवीस यांनी नाईकांना दिले आणि नाईकांच्या नाराजी नाट्यावर पडदा पडला.

.. पण पदरात काहीच पडले नाही
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गणेश नाईक यांनी नवी मुंबई महापालिकेवरील राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा उतरवून या पालिकेत भाजपचे बस्तान बसवले. त्यामुळे या निवडणुकीत नवी मुंबईतील दोन्ही मतदारसंघ नाईक यांच्या वाट्याला जातील असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात भाजपने गणेश नाईक यांच्या उमेदवारीलाच कात्री लावून त्यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर खोके सरकार अस्तित्वात आल्यानंतरही त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. आता ठाणे लोकसभेची उमेदवारीही मिळाली नाही. रातोरात राष्ट्रवादीचा झेंडा उतरवला, पण नाईकांच्या पदरात काहीच पडले नाही, अशी चर्चा आता नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.