सांगलीसह मिरजमध्ये पाणी तुंबले

आज सायंकाळी जिह्याला वादळी वाऱयासह जोरदार पावसाने झोडपले. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे दाणादाण उडाली. पलूस, तासगाव, मिरज, वाळवा, कवठेमहांकाळ तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. सांगली शहरात गारांचा पाऊस झाला. वादळी वाऱयामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळले, तर विजेच्या तारा तुटल्याने रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. कुलाळवाडीत (ता. जत) येथे वीज पडल्याने दोन जनावरांचा मृत्यू झाला.

आज दुपारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱयासह पावसाला सुरुवात झाली. पलूस, तासगाव, मिरज, वाळवा या तालुक्यांतील अनेक गावांत जोरदार पाऊस झाला. खानापूर पूर्व भागात मुसळधार पाऊस झाला असून, मोठय़ा प्रमाणावर गारपीट झाली. सांगली, मिरज शहरांसह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा वर्षाव झाला. पावसाने शहरातल्या अनेक सखल भागांतील रस्त्यांवर पाणी साचले होते. मिरज शहरात एकाच पावसात पार दैना उडाली. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे महापालिकेच्या कारभाराचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाभाडे निघाले आहे.

वीज पडून दोन जनावरांचा मृत्यू

जत तालुक्यातील कुलाळवाडी येथे वादळी वाऱयासह अवकाळी पाऊस झाला. या पावसात शेतकरी बाळू खंडू टेंगले यांच्या शेतात लिंबाच्या झाडावर वीज पडली. या झाडाखाली जनावरे बांधली होती. यामध्ये एक म्हैस व एका जर्सी गाईचा मृत्यू झाला.

शेतकऱयांना दिलासा

वाढत्या उन्हामुळे शेतातील उभी पिके पाणी देऊनही कोमेजू लागली असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱयांना दिलासा मिळाला. हा पाऊस पानमळा पिकाला जीवदान देणारा आहे. द्राक्षबागांची खरडछाटणी झालेल्या बागांना पोषक ठरणार आहे. पावसाअभावी शेतीच्या खोळंबलेल्या मशागती पुन्हा सुरू होणार आहेत.