>>प्रा. वर्षा चोपडे
आपला हिंदुस्थान देखणा आणि सारे जहां से अच्छा आहे. देशातील धुक्याने आच्छादलेली शिखरे, उत्साही प्रवाह, धबधब्याची विहंगम रूपे, हिरवेगार जंगल, विविध वृक्षवेली आणि निसर्गाचा उत्तम आनंद लुटण्यासाठी एखाद्या अद्भुत ठिकाणाला भेट द्यायची असेल तर केरळला आवर्जून भेट द्या. केरळमध्ये एकूण 27 अप्रतिम सुंदर धबधबे आहेत. केरळमधील धबधबे त्याच्या मोहक सौंदर्याने जगभरातील पर्यटकांना भुरळ घालतात. दाक्षिणात्य सिनेमांमध्ये जी नैसर्गिक दृश्ये आपण बघतो त्याला तोड नाही. येथील धबधब्यांच्या वाटेवरचे स्वर्गीय वातावरण, सुपारी, मिरपूड, आले आणि मसाल्यांच्या बागा आपल्या अनोख्या सुगंधाने मन बेभान करतात. केरळात अनेक धबधबे आपण बघू शकतो आणि त्यात तुडुंब भिजू शकतो. परिवारासोबत त्याचा आनंद लुटू शकतो. मी भेट दिलेले काही धबधबे मला अवर्णनीय वाटतात. कारण स्वच्छ नितळ पाणी आणि सुरक्षित जंगल मन भारावून टाकतात, तर पहिला धबधबा आहे अथिरपिल्ली धबधबा. त्रिशूर जिह्यातील चालकुडी तालुक्यातील अथिराप्पिल्ली पंचायतीमध्ये चालकुडी नदीवर स्थित आहे. कोची शहरापासून अंदाजे 60 किलोमीटर अंतरावर असून ‘बाहुबली’ सिनेमात हा धबधबा अप्रतिम चित्रित केला आहे. त्यामुळे पर्यटक मुद्दाम या धबधब्याला भेट देतात. अथिरापिल्ली फॉल्स हा केरळमधील सर्वात मोठा धबधबा आहे आणि त्याला ‘दक्षिण हिंदुस्थानातील नायगारा’ असे टोपणनाव आहे. पण आता ‘बाहुबली’ सिनेमामुळे पर्यटक याला ‘बाहुबली धबधबा’ म्हणून संबोधतात. थिरापिल्ली ते वाझाचल धबधबा या मार्गावर रस्त्याच्या अगदी जवळ आणखी एक धबधबा आहे, ज्याला स्थानिक भाषेत ‘चारपा धबधबा’ म्हणतात. जवळच असलेला एझात्तुमुघम प्रकृति ग्रामम् येथील वाढाचल धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी आहे. पावसाळय़ात जून-सप्टेंबरला लाखो पर्यटक फॉल्स आणि वाझाचल पिकनिक स्पॉटला भेट देतात. अथिरप्पिली हे तामीळनाडू आणि केरळला जोडणाऱया राज्य महामार्गावर घनदाट जंगलात वसलेले आहे. त्यामुळे रात्रीच्या प्रवासाला परवानगी नाही. दोन्ही बाजूंच्या चौक्या संध्याकाळी साडेसहा वाजता बंद होतात. त्यापूर्वी सर्व वाहनांना दोन्ही चेकपॉइंटमधून बाहेर पडावे लागते.
दुसरा धबधबा थुशारागिरी. कोझिकोडपासून 50 किमी अंतरावर असलेल्या थुशारागिरी धबधब्यात एरत्तुमुक्कू, माझविल चट्टोम आणि थुंबिथुल्लम पारा यांचा समावेश आहे. येथे ट्रेकिंगद्वारे किंवा वाहनाने सहज पोहोचता येते. धबधब्यांमुळे पर्वताच्या शिखरावर तयार झालेल्या सुंदर चांदीच्या मुकुटावरून थुशारागिरी किंवा ‘मिस्ट-कॅप्ड पीक्स’ हे नाव पडले आहे. पश्चिम घाटातून उगम पावणारे दोन प्रवाह येथे मिळून चालीपुझा नदी बनते. नदी तीन धबधब्यांमध्ये वळते आणि एक बर्फाच्छादित स्प्रे तयार करते, ज्यामुळे ‘थुशारागिरी’ हा शब्द आहे. ज्याचा अर्थ बर्फाच्छादित पर्वत असा आहे. पावसाळा आणि हिवाळय़ाचा काळ या धबधब्यास भेट देण्यास उत्तम आहे. अनेक पर्यटक येथे धबधब्याचा आनंद लुटतात. तुषारगिरी धबधब्याजवळ चाळीपुझा येथे तुषारगिरी पूल आहे. हा केरळमधील सर्वात उंच कमान पुलांपैकी एक आहे.
तिसरा पलारुवी धबधबा. हा धबधबाही अत्यंत प्रसिद्ध आहे. केरळ-तामीळनाडू सीमेजवळ स्थित पलारुवी धबधबा, थेनमालाच्या डोंगराळ प्रदेशात एक प्रमुख आकर्षण आहे. पलारुवी म्हणजे ‘दुधाचा प्रवाह’. या धबधब्यात पाणी 300 फूट उंचीवरून खडकांमधून खाली येते. हे एक आनंददायक पिकनिक स्पॉट बनले आहे, जिथे कोणीही विनाव्यत्यय विहंगम दृश्याचा आनंद घेऊ शकतो. फेसाळणारे पाण्याचे प्रवाह, चांदीसारखा चमचमणारा आणि थंड वातावरण असलेला हा धबधबा डोळय़ांचे पारणे फेडतो. पलारुवी कोल्लमपासून सुमारे 75 किमी अंतरावर आहे आणि या जल-स्वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना सुमारे चार किमी खोल जंगलात जावे लागते. धबधब्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी सरकारी वाहन व्यवस्था आहे. त्यामुळे वेळ असेल तर स्वर्गीय केरळला आणि या धबधब्याला जरूर भेट द्या.
– [email protected]
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)