विकेंडपासून तीन दिवस सूर्य आग ओकणार!

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेला पाऱ्याचा तोरा विकेंडपासून तीन दिवस कायम राहणार असून तापमान 37 ते 38 अंशांवर जाणार आहे. त्यामुळे शनिवार, रविवार आणि सोमवारी उकाडा आणखी वाढणार असल्याने मुंबईकरांनी आवश्यक काळजी घ्यावी, असे आवाहन कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आले आहे.

मुंबई-महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून तापमानाचा पारा चाळिशी ओलांडत आहे. काही ठिकाणी पाऱ्याने 42 अंशांपर्यंत मजल मारली आहे. मुंबईतही उकाडा प्रचंड वाढल्यामुळे तापमानात वाढ झाल्यामुळे उष्माघात झाल्यास रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी पालिकेच्या केईएम नायर सायन व कूपर रुग्णालयात कोल्ड रूम तैनात करण्यात आले आहेत. यातच पुन्हा तापमान वाढ होण्याचा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे एप्रिल अखेरीस वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांचा घामटा निघणार आहे. दरम्यान, शनिवार, रविवार व सोमवारी पारा चढा असणार असल्याने गरज नसल्यास दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

म्हणूनच वाढणार तापमान

उत्तरेकडील वारे वाहू लागल्याने मुंबई व परिसरातील तापमानात वाढ होते. उत्तरेकडील वारे वाहू लागल्याने गरम हवा एकाच जागी रोखते आणि गरम हवा एकाच ठिकाणी जमा होते. गरम हवेला रोखण्यासाठी काही उपाय नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

मुंबईकरांनो, काळजी घ्या

मुंबई, ठाणे, रायगडमध्ये 35 ते 40 अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली. सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान कडक उन असल्याने शक्यतो घराबाहेर पडू नये. भरपूर पाणी प्यावे, लहान मुलांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्यांना घराबाहेर नेऊ नये. शाळेत जाताना डोक्यावर टोपी आणि महिलांनी डोक्याभोवती स्कार्फ गुंडाळावा, असे आवाहन मुंबई हवामान विभाग आणि डॉक्टरांनी केले आहे

कशामुळे उष्णतेची लाट?

गुजरात आणि राजस्थान येथून उष्ण वारे वाहत असून ते अरबी समुद्रावरून मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, कोकण किनारपट्टी येथे धडकत आहेत. समुद्रावरून वारे वाहत असल्याने ते आर्द्रतायुक्त बनत असून असह्य उकाडा जाणवत आहे. आज मुंबईत अनेक ठिकाणी 34 ते 35 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शनिवारपासून काही ठिकाणी तापमानाच वाढ होईल असा अंदाज कुलाबा वेधशाळेच्या वैज्ञानिक सुषमा नायर यांनी व्यक्त केला.