विंडीजचे पुन्हा नारायण नारायण…

जशी एक खेळी आयुष्य बदलू शकते, तसेच कामगिरीतील सातत्य निवृत्त झालेल्या खेळाडूला पुन्हा संघात येण्यासाठीही भाग पाडू शकते. याचे ताजे उदाहरण वेस्ट इंडीजचा सुनील नारायण होऊ शकतो. कोलकाता नाईट रायडर्ससाठी मंगळवारी ऊडन गार्डन्सवर खेळलेल्या 109 धावांच्या खेळीने विंडीजला पुन्हा ‘नारायण नारायण’ बोलायला लावले आहे. आयपीएलमध्ये नारायणचा सुरू असलेला झंझावात मायभूमीत होणाऱया टी-20 वर्ल्ड कपमध्ये व्हावा म्हणून सुनील नारायणने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून घेतलेली निवृत्ती मागे घ्यावी आणि वेस्ट इंडीजसाठी खेळावे, अशी विनंती वेस्ट इंडीजचा कर्णधार रोवमन पॉवेलने केली आहे.

मंगळवारी सुनील नारायणच्या झुंजार शतकी खेळीने अवघ्या जगाला प्रेमात पाडले. 56 चेंडूंतील 109 धावांच्या खेळीने कोलकात्याला 223 पर्यंत नेले होते. कोलकात्याच्या धावसंख्येतील निम्मी धावसंख्या त्याच्या एकटय़ाचीच होती. त्याआधीही नारायणने 85, 47 आणि 27 धावांच्या आक्रमक खेळी करत आपल्या बॅटची चमक दाखवली होती. एवढेच नव्हे तर त्याने फिरकीवरही 7 विकेट टिपलेत. त्याच्या याच सातत्यपूर्ण खेळामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती मागे घेत पुन्हा  खेळावे, अशी गळ गेले अनेक दिवस घालत असल्याची माहिती राजस्थानचा खेळाडू आणि वेस्ट इंडीजचा कर्णधार रोवमन पॉवेलने दिली. गेले वर्षभर मी नारायणच्या मागे लागलोय, पण त्याची नकारघंटा सुरूच आहे. याबाबत मी कायरन पोलॉर्ड, निकोलस पूरन आणि ड्वेन ब्राव्होशीही बोललोय. वर्ल्ड कपच्या संघनिवडी आधी नारायण आणि आम्ही चर्चा करून याबाबत निश्चित तोडगा काढू, अशी आशाही त्याने व्यक्त केली.

नारायणने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली असली तरी तो अखेरचा टी-20 सामना 2019 साली खेळला होता. तसेच वन डेतही तो 2016 नंतर खेळलेला नाही. गेल्या वर्षी इंग्लंडसाठी बेन स्टोक्सने आपली निवृत्ती मागे घेतली होती. आता नारायणकडूनही हीच अपेक्षा आहे. त्याच्या झंझावाती फॉर्मचा वेस्ट इंडीज संघाला फायदा होईल, असा विश्वास पॉवेलने व्यक्त केला आहे. नारायणनेही सामन्यानंतर आपण सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त आहोत आणि भविष्यात काय होतेय ते पाहूया म्हणत त्याने आपला सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे. याचाच अर्थ खेळाडू आणि क्रिकेट मंडळाकडून विनंती केल्यास हा खेळाडू टी-20 वर्ल्ड कपमध्ये निश्चित खेळू शकतो.

 नारायणने विंडीजच्या खेळाडूंना केले ब्लॉक

वेस्ट इंडीजच्या सुनील नारायणने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेण्यामागे संघसहकाऱयांमधील भांडणांचे कारणही असू शकते. कारण आपण स्वतः वर्षभरापासून नारायणशी पुनरागमनाबाबत बोलण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याने आम्हा सर्वांना ब्लॉक केले आहे,’ असे रोवमन पॉवेलने पत्रकार परिषदेत सांगितल्याने ही बाब चव्हाटय़ावर आली. तो म्हणाला, ‘मी कायरॉन पोलार्ड, ड्वेन ब्रावो आणि निकोलस पूरन यांनाही नारायणशी बोलण्यात सांगितले आहे. टी-20 वर्ल्डकपसाठी ते सर्वजण विंडीजचा संघ निवडण्यापूर्वी नारायणचे मन वळवण्यात यशस्वी होतील,’ असेही पॉवेलने सांगितले.