कोरोनासारख्या मोठ्या महामारीचा धोका, चीनमध्ये शाळा बंद करण्याची तयारी, WHO ची चिंता वाढली

जगभरात आता कोरोनासारख्या महामारीचा धोका निर्माण झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून जगभरात कोरोनाचा प्रसार झाला आणि काही महिन्यातच या महामारीने जगाला विळखा घातला. आता नव्या महामारीचा धोका जगावर आहे. विशेष म्हणजे या महामारीची सुरुवातही चीनमध्येच झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) याची दखल घेत जगभरात अलर्ट जारी केला आहे. तसेच या महामारीचा धोका वाढत असल्याने चीनमध्ये शाळा बंद करण्याची तयारी करण्यात येत आहे. या रोगाचा फैलाव लहान मुलांमध्ये प्रामुख्याने होत आहे.

या रोगाची लक्षणे निमोनियासारखी आहेत. मात्र, काही लक्षणे निमोनियापेक्षा भिन्न असल्याने याचे अद्याप निदान झालेले नाही. या रोगाची लागण झालेल्या लहान मुंलांच्या फुफ्फुसांना सूज येते. तापाने अंग फणफणते. तसेच खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत आहे. या विचित्र रोगाचा प्रादूर्भाव उत्तर पूर्व बिजींग आणि लियओनिंग येथे दिसत आहे. या रोगाचा फैलाव झपाट्याने होत असून आरोग्य यंत्रणेसह इतर यंत्रणांवर ताण वाढला आहे. याबाबत प्राणी,पक्षी यांच्याकडून मानवाला संक्रमण होणाऱ्या आजारांवर लक्ष ठेवणाऱ्या प्रोमेडने जगभरात अलर्ट जारी केला आहे. कोरोनाचा अलर्टही याच संस्थेने जारी केला होता.

जागतिक आरोग्य संघटनेने या विचित्र रोगाची दखल घेत याबाबत अधिक माहिती देण्याची मागणी चीनकडे केली आहे. तसेच या रोगाने संक्रमित झालेल्यांवर योग्य देखरेख ठेवण्याचे निर्देशही दिले आहेत. या नव्या महामारीच्या धोक्याने जागतिक आरोग्य संघटनेची चिंता वाढली आहे. त्यामुळे त्यांनी अलर्ट जारी करत यावर देखरेख ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. जागतिक आरोग्य संघटना याकडे लक्ष ठेवत असून यावर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.