रेल्वे धुक्यात वाट हरवली! दिवसभरात 18 गाडय़ांना फटका

प्रातिनिधिक फोटो

देशात सध्या थंडीचा कडाका वाढला असून त्याचा थेट फटका रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना बसू लागला आहे. मध्यरात्रीपासून सकाळी उशिरापर्यंत महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा, दिल्ली परिसरात धुक्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाडय़ांना फटका बसत आहेत. रेल्वे ट्रकमधील दृश्यमानता कमालीची कमी होत असल्याने लोको पायलटला समोरील सिग्नल दिसत नाहीत. त्याचा 18 एक्सप्रेस गाडय़ांना फटका बसला असून अनेक गाडय़ा चार-पाच तास विलंब झाल्याने प्रवाशांचे प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.

रेल्वेकडून देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत लांब पल्ल्याच्या गाडय़ा चालवल्या जात असून बहुतांश गाडय़ा रात्रीच्या वेळी धावतात. त्यामुळे मध्यरात्रीनंतर गडद होत जाणारी धुक्याची चादर लोको पायलटसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. उत्तर हिंदुस्थानात 20-25 मीटरवरील दिसत नाही. त्यामुळे गोगलगायच्या वेगाने एक्सप्रेस ट्रेन चालवाव्या लागत आहेत. अनेकदा गाडय़ा जागेवरच थांबवण्याची नामुष्की लोको पायलटवर ओढावत असल्याची माहिती रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

अमृतसर-मुंबई मेल, अमृतसर- नांदेड एक्सप्रेस, नांदेड- अमृतसर एक्सप्रेस, हैद्राबाद- नवी दिल्ली एक्सप्रेस, जम्मू-अजमेर पूजा एक्सप्रेस अशा 18 गाडय़ांच्या संचालनावर परिणाम झाला असून चार-पाच तास विलंबाने धावत होत्या. त्यामुळे सदर गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची लटकंती झाली. दहा-बारा तासांच्या प्रवासाला तब्बल सोळा-आठरा तास लागले.

लोणावळा आणि कसारा घाटातही धुके

धुक्याचा परिणाम पहाटेच्या सुमारास मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाडय़ांना बसत आहे. लोणावळा आणि कसारा घाटात असलेल्या धुक्यामुळे पहाटे ताशी 40-50 किलोमीटर वेगाने गाडय़ा चालवल्या जातात. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ा विलंबाने दाखल होतात. त्यामुळे सकाळी त्यांना ट्रक उपलब्ध करून द्यावा लागत असल्याने लोकलच्या वाहतुकीवरही परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.