युवा उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण, आरोपींनी कर्नाटकातील वकिलाची केली नियुक्ती

उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी व मुलासह आत्महत्या केल्यानंतर गडहिंग्लज शहरासह तालुक्यात तीव्र पडसाद उमटले. आत्महत्येपूर्वी संतोष यांनी लिहिलेल्या चिठ्ठीत चौघांची नावे होती. त्यापैकी माजी नगरसेविका शुभदा पाटील व तिचा साथीदार सहायक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांना पोलिसांनी अटक केली. अटक केलेल्या आरोपींचे वकीलपत्र स्वीकारू नये, अशी विनंती सर्वपक्षीय नेत्यांनी वकील संघटनेला केली होती. त्यामुळे त्यांचे वकीलपत्र कोणीही घेतले नाही. त्यामुळे या दोन्ही आरोपींनी कर्नाटकातील संकेश्वर येथील वकिलाची नियुक्ती केली आहे. जनतेचा रोष पाहाता या वकिलांना मोठय़ा पोलीस बंदोबस्तात न्यायालयात आणावे लागले.

आत्महत्याप्रकरणी अटकेत असलेल्या माजी नगरसेविका पाटील व तिचा साथीदार निलंबित पोलीस अधिकारी राहुल राऊत यांना न्यायालयाने आज न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

गडहिंग्लज येथील उद्योजक संतोष शिंदे यांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये गडहिंग्लजच्या माजी नगरसेविका शुभदा पाटील, तिचा साथीदार सहायक पोलीस निरीक्षक राहुल राऊत या दोघांसह पुणे येथील विशाल बाणेकर व संकेत पाटे यांची नावे निष्पन्न झाली होती. याप्रकरणी शुभम बाबर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी चौघांवरही गुन्हा दाखल करून माजी नगरसेविका पाटील व पोलीस अधिकारी राऊत यांना अटक केली होती. या दोघांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. पोलीस कोठडीत राऊत आणि पाटील या दोघांनी तपासात सहकार्य केले नाही. त्यामुळे न्यायालयाने या दोघांना आणखी एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली होती. याची मुदत आज संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

पोलीस अधिकारी राहुल राऊत निलंबित

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक राहुल राऊत यांना अमरावती पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. खात्याअंतर्गत चौकशीनंतर त्यांच्यावर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

सरकार पक्षाला नामांकित वकील ऍड. शिवाजीराव राणे यांची साथ

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कोल्हापूर जिह्यातील नामांकित वकील ऍड. शिवाजीराव राणे गडहिंग्लज न्यायालयात आले होते. यावेळी गडहिंग्लजकर व विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी ऍड. राणे यांची भेट घेत फिर्यादीचे वकीलपत्र स्वीकारण्याची विनंती केली. ऍड. राणे यांनी या विनंतीला मान देत फिर्यादीच्या वतीने शुक्रवारी न्यायालयात युक्तिवाद केला होता. सरकारतर्फे ऍड. नीता चव्हाण व ऍड. राणे यांनी युक्तिवाद केला.