जायकवाडीला मुळा धरणातून जाणार 2.10 टीएमसी पाणी; शेतकरी संतापले

नगर,नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पावणे नऊ टीएमसी पाणी देण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून सोमवारी देण्यात आले आहेत .या आदेशामुळे नगर नाशिकमधील धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तर दुसरीकडे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. दिवाळीच्या वेळी पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यामुळे आता शेतकरी पुढे काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

जायकवाडी धरणाला नगर जिल्ह्यामधून तसेच नाशिक जिल्ह्यामधून पाणीपुरवठा केला जातो. अलीकडच्या चार वर्षांमध्ये पाण्यासाठी अनेक वेळा संघर्ष झाला आहे. त्यातच हक्काचे पाणी अगोदर जिल्ह्याला राहू द्या, मग इतरांना द्या, अशी भूमिका सुद्धा अनेकांनी घेतली आहे. जायकवाडीला पाणी देण्याचा विषय गेल्या दोन महिन्यापासून सुरू होता. सोमवारी पाणी देण्याचा निर्णय झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस. आर. तिरमनवार यांनी हे आदेश दिले असून या आदेशान्वये नगर जिल्ह्यातील मुळा धरणातून 2.10 टीएमसी , प्रवरा नदीच्या भंडारदरा , निळवंडे धरण समूहातील 3.36 टीएमसी तर नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या धरण समूहातील 2.70 टीएमसी पाणी असे एकूण 8.6 टीएमसी पाणी देण्याचे या आदेशात म्हटले आहे.

या आदेशामुळे धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची धाबे दणाणले आहे.समन्यायी पाणी वाटपाच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जायकवाडीला नगर – नाशिक जिल्ह्यातील धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्याचे आदेश देण्याची शक्यता होती. जायकवाडीला पाणी दिल्यानंतर नगर जिल्ह्यातील सिंचनाच्या आवर्तनाला टाच बसण्याच्या शक्यतेने नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण तयार झाले. मुळा ,प्रवरा ,गोदावरीचे पाणी जायकवाडीकडे नदीपात्रातून झेपावणार असले तरी प्रत्यक्षात जायकवाडीमधून परळी औष्णिक वीज केंद्राला तसेच माजलगाव धरणाकडे पाणी जाणार आहे.

पुढील पावसाळ्यापर्यंत रब्बीचे दोन तर उन्हाळी दोन आवर्तने असा हिशेब सांगितला जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या जलसंपदा विभागाच्या बैठकीमध्ये धरणामधील उपलब्ध पाणी स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यात केवळ दोन आवर्तने रब्बी व उन्हाळी मिळू शकते असे सांगितले जात आहे . प्रत्येक आवर्तनाला पाच ते साडेपाच टीएमसी पाण्याची आवश्यकता असणार आहे. जायकवाडी धरणात सध्या 45 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. समन्यायी पाणी वाटपावर चर्चा झालेली आहे. त्यानुसार नगर – नाशिक जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडेसह नाशिक जिल्ह्यातील दारणा व अन्य धरण समूहातून पाणी सोडण्याचे आदेश केव्हाही निघू शकतात. त्याप्रमाणे सोमवारी हे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक एस आर तिरमनवार यांनी काढले आहेत .

नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीचे नियोजन समन्यायी पाणी वाटपाचा संभाव्य निर्णयामुळे लांबलेले आहे. ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच नेतेमंडळींचे लक्ष लागलेले होते. पंतप्रधान मोदी यांचा दौरा संपताच पाणी वाटपाच्या निर्णयाबाबतच्या प्रशासकीय हालचालींना वेळ आला आहे. एकीकडे पाणी सोडण्याच्या हालचाली तर दुसरीकडे शेतीच्या आवर्तनांवर टाच येणार असल्याने मुळा धरण क्षेत्रातील राहुरी , नेवासा पाथर्डी शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुळा धरणातून 2.10 टीएमसी पाणी जायकवाडीला देण्यात येणार असल्याने धरणाच्या उजव्या कालव्याच्या एक तर डाव्या कालव्याच्या दोन आवर्तनांवर टाच येणार असल्याची शक्यता जाणकाराकडून व्यक्त केली जात आहे.