गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी केलेल्या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, आदित्य ठाकरे यांची मागणी

सरकारच्या आशीर्वादामुळे महानगरपालिकेत अनेक वादग्रस्त अधिकारी ठाण मांडून बसले होते. निवडणूक आयोगाने मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या बदलीचे पत्र दोन वेळा दिल्यानंतरही त्यांची बदली होत नव्हती. अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाने सोमवारी चहल यांना आयुक्तपदावरून हटवले. चहल यांच्या बदलीचे आदेश आयोगाने दिले आहेत. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत गेल्या दोन वर्षात त्यांना महानरपालिकेत केलेल्या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

”निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सरकारला मुंबईच्या आयुक्तांची बदली करण्याचे निर्देश दिले होते, तरीही मिंधे सरकार गप्पच राहिले. अखेर निवडणूक आयोगाने आज मुंबईच्या आयुक्तांना हटवले. उशीरच झाला, पण निदान योग्य निर्णय झाला. तरीही मुंबई महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी केलेल्या प्रत्येक घोटाळ्याची चौकशी केली जावी आणि जनतेच्या कराच्या पै अन् पै चा हिशोब केला जावा अशी आमची मागणी आहे”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.