सावित्री, लक्ष्मी आणि दुर्गा

>> आकाश महालपुरे

स्त्रीचा जन्म मिळायला भाग्य लागते. ज्या जिवाला हा जन्म प्राप्त झाला तो जीव महापुण्यवंत होय, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजच्या घडीलाही वारंवार ऐकायला मिळतं की, स्त्रीचा जन्म साधारण असतो. पण भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक सजीव प्राण्याचा जन्म भारी आणि साधारण ठरवणारे आपण कोण? जो सृष्टीचा निर्माता असतो तोदेखील स्त्री या शब्दापुढे नतमस्तक होत असतो. मग तिथं मानव जातीचं काय घेऊन बसलात.
‘नारी निंदा मत कर यार,
नारी है नर की खाण,
नारी से पैदा हुए राम-कृष्ण और हनुमान!’
स्त्री ही सर्व काळ पूजनीय आणि वंदनीय आहे. तिच्या प्रचंड सामर्थ्याचा कर्मनिष्ठsचा ठाव प्रत्यक्ष परमेश्वरालाही लागू शकत नाही, तर आपण कोण आहोत? स्त्री म्हणजे साक्षात रणरागिणी, स्त्री म्हणजे दुर्गा, स्त्री म्हणजे महालक्ष्मी, नव्हे नव्हे तर ती प्रत्यक्ष महिषासुरमर्दिनी होय. तिच्या स्त्रीत्वाचा प्रकाश सर्वदूर म्हणजे तिन्ही लोकांत पसरलेला आहे. याच स्त्रीत्वाचा उचित, सन्मान करताना कविवर्य ग. दि. माडगूळकर त्यांच्या एका काव्यपंक्तीत म्हणतात की,
‘पिढय़ानपिढय़ांना निर्भय आम्ही भारतीय भगिनी,
घराघरांचे दुर्ग झुंजवू झुंजू समरांगणी!’
या काव्यपंक्तीतच स्त्रीची महती आपणास समजून येते. खरं तर, स्त्रीशिवाय भूतलावरील कुठल्याच व्यक्तीचं अस्तित्व निर्माण होऊ शकत नाही. आजही स्त्रीच्या अस्तित्वाशिवाय प्रत्येक गोष्ट अपूर्ण आहे. असं असलं तरीही आज या स्त्री जातीला तिच्या अस्तित्वासाठी का म्हणून लढावं लागत आहे? का म्हणून झगडावं लागत आहे? थोडक्यात, कालखंड कोणताही असो, राजवट कोणाचीही असो, तिच्यावर होणारे अत्याचाराचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढतच आहे.
समाजाची दृष्टी व वृत्ती बदलविण्याचे सामर्थ्य आता तरी या स्त्री जातीने दाखविले पाहिजे. आहिल्याबाई होळकर, ताराबाई यांच्यासारख्या कर्तबगार स्त्रियांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.

आज समाजात स्त्रीसमोर अनेक प्रश्न आहेत, पण त्याची उत्तरं ही समस्त स्त्रीवर्गानेच शोधायची आहेत. कारण, इतिहासात डोकावून पाहिलं तर, सावित्रीच्या रूपानं शिक्षणाविरुद्ध, लक्ष्मीच्या रूपानं व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारीसुद्धा एक स्त्रीच होती. स्त्रीमुळेच काळाच्या पटलावर अनेक संस्कृती जन्माला आल्या, वाढल्या आणि बहरल्या. पण आज सर्वकाही हाताशी असताना हीच स्त्री स्वतःला दुर्बल का समजते? तिच्यात असलेलं साक्षात दुर्गेचं रूप का विसरते आहे? स्त्रियांनी त्यांची ही रूपे विसरू नये.

[email protected]