उमेद – टाकाऊपासून टिकाऊ

>>अनघा सावंत

‘टाकाऊपासून टिकाऊ’ ही मुख्य संकल्पना घेऊन निसर्गाचा समतोल सांभाळत पर्यावरणपूरक वस्तू बनविण्याचे काम करणारी सामाजिक संस्था म्हणजे ‘क्रिएटिव्ह पीपल’. या संस्थेचे आगळेवेगळे वैशिष्टय़ म्हणजे या आकर्षक, सुंदर वस्तू घडवणारे सर्जनशील हात आहेत मूकबधिर मुलांचे…

‘क्रिएटिव्ह पीपल’ ही संस्था गेली नऊ वर्षे कलेच्या माध्यमातून दिव्यांग मुलांना सक्षम बनवण्यासाठी तळमळीने कार्य करत आहे. दिव्यांगांमधील व्याधीलाच आव्हान समजून ते स्वीकारण्याचे धाडस करत डॉ. महेश ठाकूर आणि त्यांच्या पत्नी श्रीजा ठाकूर यांनी 2015 मध्ये पुण्यातील वारजे येथे ‘क्रिएटिव्ह पीपल’ची स्थापना केली. याविषयी श्रीजा म्हणाल्या, “माझे पती दिव्यांगांवर पीएचडी करत असताना त्यांच्या लक्षात आलं की, इतर दिव्यांगांसाठी सरकारतर्फे काही ना काही योजना आहेत, पण मूकबधिर मुलांसाठी काहीच योजना नाहीत. तसंच समाजात किंवा घरातही ही मुलं दुर्लक्षित राहतात. या मुलांचं दिव्यांगत्व लगेच दिसून येत नाही, तर त्यांच्याशी संवाद साधल्यावर लक्षात येतं. या सर्व विचारांती ज्यांचं कोणीच नाही अशा मूकबधिरांसाठी आम्ही काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. मला कला, हस्तकलेची विशेष आवड असल्यामुळे कलेच्याच माध्यमातून या मुलांना स्वतच्या पायावर उभं करावं ही संकल्पना सुचली.

संस्था या मुलांना सर्व प्रकारच्या सुतारकामाचे तसेच रंगकामाचेही प्रशिक्षण देते. सुतारकामासाठी कारखान्यातील टाकाऊ लाकूड तसेच टाकाऊ टायर यांचा वापर केला जातो. श्रीजा यांच्या प्रशिक्षणाखाली ही दिव्यांग मुले टायर्सपासून सोफा, टेबल, खुर्च्या तसेच लाकडापासून चहा कोस्टर, पेन स्टँड, लॅम्प, घडय़ाळ इ. आकर्षक आणि टिकाऊ गृहसजावटीच्या वस्तू बनवतात. गणेशोत्सवात तर या मुलांनी बनवलेल्या सुंदर मखरांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. या मुलांच्या उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देत संस्थेने त्यांना त्यांच्या हक्काचे उत्पन्नही प्राप्त करून दिले आहे. श्रीजा यांनी पाच-सहा मुलांपासून सुरू केलेल्या या संस्थेत आज एक अर्धदृष्टिहीन आणि 13 मूकबधिर मुले काम करून स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभी आहेत. श्रीजा यांच्या या कार्यात सुशील वाघचौरे आणि शैला पटवर्धन यांची मोलाची साथ असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

कोविड काळातही मुलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह थांबू नये या भावनेने काळजीपूर्वक, स्वत:वर जोखीम घेत श्रीजा यांनी ही संस्था एक दिवसही बंद ठेवली नाही. गणेशोत्सव आणि दिवाळी सणांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे महामारीची धग संस्थेने मुलांपर्यंत पोहोचू दिली नाही. सध्या गृहसजावटीच्या वस्तूंबरोबरच टोड बॅग्स, अप्रतिम रंगकाम केलेल्या ओढण्या, विविध रांगोळ्या या वस्तूही इतक्या कलात्मकतेने ही मुले बनवतात. या वस्तू खरेदी करताना त्यांच्याकडे दयाबुद्धीने न पाहता त्या खरोखरच चांगल्या घडवलेल्या आहेत म्हणून पाहावे. म्हणजे या संस्थेचा उद्देश सफल होईल.

कर्वे समाज सेवा संस्थाचे विश्वस्त मधुकर पाठक आणि शिल्पा पाठक यांच्या सहकार्य आणि पाठबळामुळे गेल्या वर्षीपासून कर्वे समाज सेवा संस्थेच्या आवारात ही संस्था आपली वाटचाल मोठय़ा दिमाखाने करत आहे. तसेच पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या सहकार्यामुळे आज ‘क्रिएटिव्ह पीपल’ची दोन ठिकाणी विक्री केंद्रेही आहेत.