आनंदराज आंबेडकर यांचे प्रकाश आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीला पत्र, वाचा काय म्हणाले

अमरावती मतदारसंघातील रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर यांनी आपली लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर त्यांनी या संदर्भात त्यांनी वंचित बहुजन आघाडीला एक पत्र लिहिलं आहे. तत्पूर्वी आपण उमेदवारी मागे घेतल्याची माहिती त्यांनी त्यांच्या समाज माध्यमातून दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्याविषयीचा उल्लेख करत आनंदराज आंबेडकर आपल्या पत्रात म्हणाले आहेत की, वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे आपले दि. ०४/०४/२०२४ रोजीचे माझ्या अमरावती मतदारसंघातील उमेदवारीला पाठिंबा असल्याचे पत्र मला सोशल मीडिया च्या माध्यमातून मिळाले. सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो. परंतु आपल्या सदर पत्रात आपण माझ्या उमेदवारीला वंचित बहुजन आघाडी समर्थन करेल व वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेला उमेदवार नामांकन दाखल करणार नाही असे आपल्या पक्षाने व अधिकृत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आम्हाला कळवले आहे. हा तुमचा प्रयत्न अतिशय धादांत खोटा, चुकीचा आणि संविधान प्रेमी जनतेची दिशाभूल करणारा आहे.’ असं आनंदराज आंबेडकर आपल्या पत्रात म्हणाले आहेत.

ते पुढे लिहितात की, मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की माझ्या नामांकन दाखल करण्याच्या दिवशी आपल्या महाराष्ट्र प्रदेश पदाधिकाऱ्यांनी अमरावतीमधील स्थानिक वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना माझ्या नामांकन रॅलीमध्ये कोणीही सहभागी होऊ नका अशा फोनद्वारे सूचना वजा ताकीद देण्यात आली होती अशी आम्हाला खात्रीशीर माहिती मिळाली आहे. सदरहू मी तीन दिवस अगोदर पासून वंचित बहुजन आघाडीला पाठिंब्यासाठी पाठवलेल्या पत्रानुसार पाठिंब्याच्या प्रतिक्षेत होतो आणि अखेरीस नाईलाजास्तव संविधान प्रेमी जनतेची पुन्हा एकदा मतविभागणी होऊन भाजपा सरकार येऊ नये म्हणून माझ्या पक्ष संघटनेने निर्णय घेऊन माझी अमरावती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी मागे घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि संबंधित पत्र मी दिनांक ०३/०४/२०२४ ला माझ्या आधिकृत फेसबुक पेज वरून प्रसारित केले. आता त्यामध्ये किंचितही बदल होणे शक्य नाही. तेव्हा आपण उशीरा दिलेल्या पाठिंब्याबद्दल पुनःच्छ आपले आभार आणि माझ्याकडून शुभेच्छा, असं आनंदराज आंबेडकर यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे.