आभाळमाया – ‘ऍरिसिबो’ आणि संदेश…

>> वैश्विक

या आधीच्या लेखात आपण परताऱयाभोवतीच्या एखाद्या ग्रहावर, इतरांशी संपर्क करू शकेल, एवढी प्रगत जीवसृष्टी आहे का, याचा वेध घेण्यासाठी कार्यरत असलेल्या ‘सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्टिअल इन्टेलिजन्स’ म्हणजेच ‘सेटी’ नावाच्या प्रकल्पाची माहिती घेतली. मात्र हा ‘सर्च’ आजवर तरी फलद्रूप झालेला नाही. कदाचित आपण, रेडिओ संदेश ‘ग्रहण’ करण्याची क्षमता प्राप्त करण्यापूर्वीच जर कोणी, दोन-तीनशे वर्षांपूर्वी असे संदेश पाठवले असतील तर त्याचा सुगावा आपल्याला लागणं शक्यच नव्हतं. आपलं तंत्रज्ञान अंतराळाला भिडल्यानंतर मात्र कोणा ‘दूरस्था’ने संपर्क साधलेला नाही, अथवा इतर कोणत्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केला असल्यास तो आपल्याला समजलेला नाही, परंतु विश्वातील रेडिओ स्रोतांचं महत्त्व लक्षात घेता, संपर्क-संदेश मुख्यत्वे याच स्वरूपात असू शकतो एवढं आपल्याला समजलंय. त्यामुळे अशा संभाव्य संदेशांच्या देवाण-घेवाणाची तयारी रेडिओ-टेलिस्कोपच्या माध्यमातून सुरू आहे.

असा एखादा संदेश ‘बीप… बीप…’ अशा भाषेतच येणार आणि तो ‘डिकोड’ करावा लागणार. म्हणजे उलगडावा लागणार. कारण, कोणतीही एक प्रचलित भाषा जिथे समस्त पृथ्वीवासीयांनाही समजत नाही तर परस्थ संदेशांची ‘भाषा’ कशी कळणार? ती रेडिओ संदेशांची असेल तर, काही आडाखे बांधता येतील. मात्र त्यासाठी केवळ कोणीतरी रेडिओ संदेश पाठवेल म्हणून वाट बघत स्वस्थ बसता येणार नाही… आणि आपण तसे निवांत बसलेलो नाही. आपल्या अंतराळ संशोधकांनी 16 नोव्हेंबर 1974 या दिवशी, आपल्या आकाशगंगेच्या केंद्रकाजवळ असलेल्या शौरी (हर्क्युलस – एम – 13) या बंदिस्त तारकासमूहाच्या दिशेने रेडिओ संदेश पाठवला आहे.
अर्थात हा संदेश तिथे पोचायला प्रकाशाच्या वेगाने 25 हजार वर्षे आणि त्याला उत्तर मिळालं तर ते आपल्याला समजायला आणखी तेवढीच म्हणजे एकूण 50 हजार वर्षे लागतील. आता कुठे हा संदेश पाठवून उणीपुरी 50 वर्षेच होतायत. नोव्हेंबरमध्ये पुन्हा ‘ऍरिसिबो मेसेज’चा आढावा घेऊच. आता हे ऍरिसिबो काय आहे? असा प्रश्न पडला असेल तर अमेरिकेतल्या पर्टेसरिको येथील एक गाव आहे. ही मूळची स्पॅनिश वसाहत. तिथे रेडिओ टेलिस्कोप उभारण्याची कल्पना 1963 मध्ये आली. तिथे 118 एकरच्या गोलाकार नैसर्गिक दरीत (सिंकहोल) 305 मीटर व्यासाची ‘डिश’ असलेली एक रेडिओ – दुर्बिण उभारली गेली. ही ‘डिश’ या नैसर्गिक रचनेचा वापर करून बनवली आणि मध्यभागी 150 मीटर उंचीवर संदेश-ग्रहण करणारा ‘रिसिव्हर’ बसवण्यात आला. 2016 पर्यंत ही जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बिण होती. आमच्या खगोल मंडळाचे सतीश डोईफोडे यांनी या दुर्बिणीला भेट दिली होती. इथूनच शौरी तारकासमूहाकडे समस्त मानवप्राण्यांच्या वतीने, 1974 मध्ये रेडिओ-संदेश धाडण्यात आला आहे. 2017 पर्यंत या दुर्बिणीचं काम व्यवस्थित चाललं, पण वादळाच्या तडाख्याने त्या वर्षी ती निकामी झाली. तोपर्यंत चीनने 2016 च्या जुलै महिन्यात उभारलेला 500 मीटर व्यासाची ‘डिश’ असलेला रेडिओ-टेलिस्कोप कार्यरत झाला होता. त्यामुळे ऍfिरसिबोचं महत्त्व ओसरलं होतं. त्यातच 2020 मध्ये त्याच्या केबल कोसळून नुकसान झालं आणि 2023 मध्ये तो बंद करून तिथे शैक्षणिक केंद्र सुरू केलं गेलं.
परंतु ‘ऍरिसिबो’ने त्याच्या आयुष्यात परताऱयाकडच्या संभाव्य ग्रहांवरील शक्य असणाऱया, अज्ञात ग्रहांच्या दिशेने पाठवलेला संदेश महत्त्वाचा आहे. हा संदेश अनेक नामवंत संशोधक अभ्यासकांनी विचारपूर्वक ‘लिहिला’ आहे. या सांकेतिक संदेशाचे जनक आहेत, कॉर्जिल विद्यापीठ तसंच ऍरिसिबोतील संशोधक फ्रॅन्क ड्रेक, रिचर्ड आयसॅकमन, लिन्डा मे, जेम्स वॉल्टर आणि प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक कार्ल सेगन. इतक्या बुद्धिमंतांनी आकाराला आणलेल्या या संदेशात आहे काय?
हा रेडिओ-संदेश असल्याने, तो ‘बिट’मध्ये आहे. ते बीट्स आवाजी स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यातून प्रत्येकी 23 बीट्सच्या अनेक ओळीतून हा 1,679 बायनरी डिजिटचा संदेश नोंदलेला असून, 2340 मेगाहर्टस् तरंग लांबीत 210 बाइट्सच्या वेगाने तो जात आहे. शून्य आणि एक यांच्या विविध प्रकारच्या रचनेतून (कॉम्बिनेशन) पाठवलेल्या या संदेशात, काय आहे त्याचं चित्र उपलब्ध आहे. ते आपल्याला समजावं म्हणून विविध रंग वापरले आहेत. मात्र अंतराळात केवळ ‘बीट्स’च पोचणार संदेशात आणि इथल्या चित्रात. हायड्रोजन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस हे मानवी ‘डीएनए’ दाखवणारे ‘बीट्स’ आहेत. (चित्रात जांभळय़ा रंगात) 1 ते 10 अंकांचे बीट्स (पांढऱया रंगात) तसंच विविध रासायनिक सूत्रं (हिरव्या रंगात) 5 फूट 9 इंचाची मानवी आकृती, जी या चित्रातल्या पिक्सेलमधून दिसेल. (ती निळय़ा-पांढऱया रंगात) याशिवाय सूर्यमाला प्लूटोसह काही बीटस्मधून कळावी अशी अपेक्षा आहे. (तेव्हा प्लूटोला ग्रह मानलं जायचं. असा तो खुजा ग्रह आहे.) प्रत्येकी 23 बीट्सच्या ओळीतील पहिली ओळ म्हणजे आधी 6 शून्य मग 10 आकडा 3 वेळा आणि त्यानंतर 10 वर 9 शून्य अशा स्वरूपातील आहे. ती अशी लिहिता येईल-
000000,10,10,10,0,00000000
अशा सुमारे सत्तरपेक्षा जास्त ओळी होतील. असा हा अद्वितीय संदेश पाठवणारी ‘ऍरिसोबो’ रेडिओ दुर्बिण मात्र आता अस्तित्वात नसली तरी 24 हजार 950 वर्षांनी असे संदेश ग्रहण करणारी प्रभावी यंत्रणा आपल्याकडे नक्कीच असेल.

[email protected]