आभाळमाया – ‘अर्टेमिस’चे उड्डाण लांबले…

>> वैश्विक

अंतराळयानाने अवकाशात झेप घेण्यापूर्वी वैज्ञानिकांना तपशीलवार माहिती घ्यावी लागतेच, पण उड्डाण होईपर्यंत अनेक चाचण्या पुनःपुन्हा करून त्या कार्यक्रमावर बारकाईने नजर ठेवावी लागते. त्यामुळे अनेक अंतराळयानांच्या तारखा आणि वेळा ऐन वेळी बदलल्या जातात. यशस्वी उड्डाणात थोडीशीही बाधा येणार असल्याची शंका आली तर अगदी काऊंटडाऊन सुरू झाल्यानंतरही अंतराळ प्रवास रोखला गेल्याची उदाहरणं आहेत आणि ते योग्यच आहे.

अमेरिकेच्या ‘अर्टेमिस’ मोहिमेचं असंच झालं. 1972 पर्यंत चंद्रावर 12 अंतराळयात्री उतरवणाऱ्या अमेरिकेने नंतरच्या 50 वर्षांत चंद्राकडे विशेष लक्ष दिलं नव्हतं, परंतु जगातल्या अनेक देशांनी चंद्राचा वेध घ्यायला सुरुवात केल्यावर आणि अमेरिकेतल्याच ‘एलॉन मस्क’सारख्यांनी ‘स्पेस-एक्स’ ही खासगी अंतराळ प्रवास एजन्सी स्थापन केल्यावर ‘नासा’ने पुन्हा चंद्रावर माणूस पाठवायचं ठरवलंय.

हिंदुस्थानचं ‘चांद्रयान-3’ चंद्राच्या दक्षिण ध्रुव भागात प्रथमच गेल्यानंतर रशिया, चीन, जपानही चांद्र स्पर्धेत भाग घेताना दिसतायत. मग चंद्रावर पहिला माणूस धाडणारी अमेरिका मागे कशी राहील? 2017 पासून अमेरिकेने पुन्हा एकदा चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी सुरू केली. ‘अर्टेमिस’ रॉकेटवरून ‘ओरायन’ चंद्रावर पाठवण्याची तारीख 2016 मधली होती. ती लांबली आणि कोविडने जग ग्रासल्यानंतर सगळीच मोहीम काही काळासाठी स्थगित करावी लागली. अखेरीस 16 नोव्हेंबर 2022 रोजी ‘अर्टेमिस-1’ या यानाने उड्डाण केलं आणि ही ‘टेस्ट फ्लाइट’ यशस्वी ठरल्यावर या मालिकेतली पुढची यानं 2024 आणि 2025 मध्ये उड्डाण करतील, असं सांगण्यात आलं. आता त्यात बदल झाला आहे.

ही सर्व मोहीम अनेक सरकारी आणि खासगी स्पेस एजन्सींच्या सहयोगातून पूर्णत्वाला जाणार आहे. यामध्ये आतापर्यंत 29 देशांनी सहभागाची तयारी दाखवली आहे. कॅनडा, जपान, ब्रिटन या मोठय़ा देशांबरोबरच हिंदुस्थानचाही त्यात समावेश आहे. याशिवाय ‘स्पेस पॉवर’ म्हणून पुढे येऊ पाहणारे ब्राझील, मेक्सिको, द. कोरिया, यूएई असेही देश यात सामील आहेत. थोडक्यात, यापुढच्या चांद्र मोहिमा जागतिक सहकार्याने होणार ही चांगली गोष्ट आहे.

1957 मध्ये रशियाचा (तत्कालीन यूएसएसआर) ‘स्पुटनिक’ अवकाशात गेल्यानंतर बराच काळ रशिया आणि अमेरिकेने त्यांचं ‘शीतयुद्ध’ अंतराळापर्यंत नेलं होतं. यांनी एक यान पाठवलं की, त्यांनी नव्या मोहिमेची घोषणा करायची हा परिपाठच झाला. 1958 मध्ये युरी गागारिन नावाचा पहिला अंतराळवीर रशियाने यशस्वीरीत्या ‘स्पेस’मध्ये नेऊन आणला आणि ‘प्रगत’ अमेरिकेची प्रतिष्ठा पणाला लागली. या दशकाच्या (1960 ते 70) अखेरपर्यंत आम्ही थेट चंद्रावर माणूस पाठवणार. हे काम सोपं नाही हे आम्हाला ठाऊक आहे, पण ते अवघड असल्यानेच आम्ही हाती घेत आहोत, या तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष जॉन केनेडींच्या ओजस्वी वक्तव्याने अमेरिकेत उत्साह संचारला आणि 20/21 जुलै 1969 मध्ये आर्मस्ट्रॉन्ग चंद्रावर उतरला… ते पहायला मात्र केनेडी हयात नव्हते.

त्यानंतर अमेरिकेने 1972 पर्यंत अनेक चांद्र मोहिमा करून तिथे माणसं पाठवायचा धडाकाच लावला. त्यानंतर त्यांच्या चांद्र मोहिमा थांबल्या. तोपर्यंत तरी चंद्रावर संशोधनासाठी जाण्याचेच मनसुबे होते, परंतु बदलत्या काळात तिथे वसाहत करून किंवा इतर ग्रहांच्या (विशेषतः मंगळ) मोहिमांसाठी चांद्रतळ किती उपयुक्त ठरतो याचा विचार होऊ लागला. त्यापलीकडे जाऊन मस्क यांच्यासारखे तर चांद्र पर्यटनाच्या गोष्टी करू लागले तेव्हा जागतिक सहकार्याने पुन्हा चांद्र मोहिमा होताना दिसतील.

त्यासाठीच ‘अर्टेमिस-1’च्या उड्डाणाद्वारे ‘रोबोटिक क्रू’ पाठवून यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ‘अर्टेमिस-2’ 2025 मध्ये काही खऱ्या अंतराळवीरांचा ‘क्रू’ घेऊन उड्डाण करेल आणि 2026 मध्ये चांद्रयानासह ‘अर्टेमिस-3’ चंद्राकडे जाईल.या मोहिमेचे पृथ्वीवरील फायदे म्हणजे त्यानिमित्ताने अनेक नव्या उद्योगांना काम मिळेल. नवे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कामगार मोठय़ा संख्येने तयार होतील. ‘ल्युनार इकॉनॉमी’च त्यातून आकाराला येईल. सर्व देशांतील संशोधकांना त्यात वाव असेल.

अमेरिकेच्या 1969 ते 72 मधल्या चांद्र मोहिमांमध्ये सर्व चांद्रवीर पुरुषच होते. ‘अर्टेमिस’ मोहिमेत महिला चांद्रयात्रींचासुद्धा समावेश असेल. याशिवाय वैज्ञानिक दृष्टीने सांगायचं तर चंद्रावर अंतराळ अभ्यास केंद्र उभारता आलं तर आपल्या ग्रहमालेचा आणि सौर संकुलाचा अधिक चांगला आणि वेगळ्या प्रकारे अभ्यास करता येईल. कोणतंही नवं अंतराळ संशोधन किंवा मोहीम पृथ्वीवरच्या जनसामान्यांच्या जीवनातही नकळत बदल करतेच. अंतराळ मोहिमा खर्चिक असल्या तरी शेतीपासून तंत्रज्ञानापर्यंतच्या अनेक गोष्टींसाठी त्यातून फायदे होतात. तसेच अधिक सोप्या संशोधनाला चालना मिळेल. ‘लॅपटॉप’ हे अशाच संशोधनाचं फलित आहे. अशा अनेक गोष्टी आहेत. त्याविषयी पुन्हा केव्हातरी, परंतु ‘अर्टेमिस’मध्ये अमेरिका जगाला सामील करून घेतेय हे जागतिक सौहार्दाच्या दृष्टीने महत्त्वाचं.