मुद्दा – घातक आजार आणि अकाली मृत्यू

file photo

>> डॉ. प्रीतम भि. गेडाम

देशात झपाटय़ाने वाढत असलेले गंभीर आजार आणि अकाली मृत्यू चिंताजनक आहेत. आधुनिक जीवनशैली, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी यामुळे आपल्या जीवनात बरेच वाईट बदलदेखील झाले आहेत. लठ्ठपणाच्या जोखमींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि जागतिक लठ्ठपणाचे संकट संपवण्यासाठी दरवर्षी 4 मार्च रोजी जगभरात ‘जागतिक लठ्ठपणा दिन’ पाळला जातो. अनारोग्यकारक खाण्याच्या सवयींबरोबरच शारीरिक हालचालींचा अभाव, पुरेशी झोप न मिळणे, अति ताणतणाव, आजार, आनुवंशिकता, औषधांचे दुष्परिणाम, सभोवतालचे वातावरण हेही जास्त वजन आणि लठ्ठपणाच्या जोखमीला कारणीभूत आहे. भारतीय फास्ट फूड मार्केट अंदाजे 27.57 दशलक्ष डॉलर्स इतके आहे. एका विशेष अहवालानुसार, देशातील मोठय़ा शहरांमधील फास्ट फूड रेस्टॉरंट्सवरील मध्यमवर्गीय कुटुंबांचा वार्षिक खर्च 2022 पर्यंत 108 टक्क्यांनी वाढला आहे.

ओबेसिटी अॅटलस 2023 ने स्थूलतेच्या बाबतीत 183 देशांपैकी भारताला असंसर्गजन्य रोग म्हणून 99व्या स्थानावर ठेवले आहे. नॅशनल हेल्थ फॅमिली सर्व्हे 5च्या आकडेवारीनुसार, बीएमआय निकषांनुसार 23 टक्के महिला आणि 22.1 टक्के पुरुषांचे वजन जास्त आहे. देशातील 40 टक्के महिला आणि 12 टक्के पुरुषांना पोटाच्या लठ्ठपणाचा त्रास आहे. भारतीय राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-4 नुसार, 2006 ते 2016 या कालावधीत, 15 ते 49 वयोगटातील महिलांमधील लठ्ठपणा 13 टक्क्यांवरून 21 टक्क्यांपर्यंत वाढला आहे आणि 15 ते 49 वयोगटातील पुरुषांमधील लठ्ठपणा 9.3 टक्क्यांवरून 19टक्क्यांपर्यंत वाढला. बहुतेक भारतीयांचा दरवर्षी हृदयविकारामुळे मृत्यू होतो आणि त्यापैकी सुमारे 60 टक्के लोकांना मधुमेह आहे. असा अंदाज आहे की, 2050 पर्यंत 130 दशलक्षांपेक्षा जास्त रुग्णांसह भारत मधुमेहामध्ये जगात आघाडीवर असेल.

डब्ल्यूएचओच्या मते, 1975 पासून जगभरात लठ्ठपणा जवळ जवळ तिप्पट झाला आहे. 2016 मध्ये, 18 आणि त्याहून अधिक वयाच्या 1.9 अब्जाहून अधिक प्रौढांचे वजन जास्त होते. यापैकी 650 दशलक्षाहून अधिक लोक लठ्ठ होते. जगातील बहुतेक लोकसंख्या अशा देशांमध्ये राहते, जेथे जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे कमी वजन असलेल्या लोकांपेक्षा जास्त मृत्यू होतात. 2020 मध्ये, 5 वर्षांखालील 39 दशलक्ष मुले जास्त वजन किंवा लठ्ठ होती. 2016 मध्ये 5-19 वयोगटातील 340 दशलक्षाहून अधिक मुले आणि किशोरवयीन मुलांचे वजन जास्त किंवा लठ्ठ होते. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेच्या (फाओ) 2023 च्या अहवालानुसार, अस्वास्थ्यकर आहारामुळे होणारे लठ्ठपणा आणि असंसर्गजन्य रोगांमुळे कामगार उत्पादकतेत शेकडो अब्ज डॉलर्स खर्च होत आहेत आणि अस्वास्थ्यकर आहार पद्धतींशी संबंधित अंदाजे हानींच्या बाबतीत भारत 154 देशांमध्ये तिसऱया क्रमांकावर आहे, जे खूप चिंताजनक आहे. 2011 पासून भारतात वापरल्या जाणाऱया अल्ट्रा प्रोसेस्ड अन्नाचे एकूण प्रमाण 90 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे. प्रौढ बॉडी मास इंडेक्स किंवा बीएमआय इंडेक्सनुसार, जर तुमचा बीएमआय 18.5 ते 24.9 असेल तर ते निरोगी वजन श्रेणीत येते. जर तुमचा बीएमआय 25.0 ते 29.9 असेल तर तो जास्त वजनाच्या श्रेणीत येतो. उंचीनुसार वजन असावे. कर्बोदके, बटाटे, भात, मिठाई यांसारखे पदार्थ वजन वाढण्यास जबाबदार असतात. म्हणून फक्त तेच पदार्थ खा, जे तुमच्या शरीरात अतिरिक्त पॅलरी जोडणार नाहीत. पॅलरीजची आदर्श पातळी रोजच्या आहाराव्यतिरिक्त वय, चयापचय आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असते. साधारणपणे महिलांसाठी दररोज 2000 पॅलरीज आणि पुरुषांसाठी 22,500 पॅलरीजची शिफारस केली जाते.

प्रदूषणात गुदमरणारा श्वास, सर्वत्र भेसळ, पॅकबंद अन्न, अन्न पदार्थांचा निकृष्ट दर्जा आणि त्यात जीवनावश्यक पोषक घटकांचा तीव्र तुटवडा, पिकांमध्ये घातक रसायनांचा वापर, व्यायामाचा अभाव, यांत्रिक उपकरणांवरचे वाढते अवलंबित्व यामुळे आरोग्य खराब होऊन मानवी जीवन उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे जीवघेण्या आजारांमुळे अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मनुष्याने स्वतःला अशा उंबरठय़ावर आणले आहे, जिथे आरोग्याच्या समस्यांचा ढीग आहे, ज्यामध्ये लठ्ठपणादेखील प्रमुख आहे. लठ्ठपणा टाळता येतो, योग्य दैनंदिन दिनचर्येतून आपण चांगले आरोग्य मिळवू शकतो.

[email protected]