ठसा – सुरेश वालीशेट्टी

>> प्रभाकर पवार

जगात नावलौकिक असलेल्या मुंबई डिटेक्शन क्राइम ब्रँचमधून दीड दशकापूर्वी सेवानिवृत्त झालेले सुरेश साताप्पा वालीशेट्टी या शौर्यपदक विजेत्या पोलीस अधिकाऱ्याचा, वृक्ष व ग्रंथप्रेमी समाजसेवकाचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार देऊन नुकताच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

पिपल्स आर्टस् सेंटर (मुंबई) या संस्थेने पवई-हिरानंदानी येथे सिनेअभिनेता सुबोध भावे, सुरेश वालीशेट्टी आदी 24 मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. महाराष्ट्र पोलीस दलात सुरेश वालीशेट्टी यांना ओळखत नाही असा पोलीस सापडणार नाही, इतकी या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची देदीप्यमान कामगिरी आहे. तीन शौर्यपदकांसह राष्ट्रपतींची 4 पदपं मिळविणारा महाराष्ट्रातील हा एकमेव पोलीस अधिकारी आहे. परंतु शिवाजी महाराजांपासून लहानपणापासून स्फूर्ती घेतलेल्या, शौर्य काय असते हे वाचलेल्या-अनुभवलेल्या या अधिकाऱ्याला छत्रपतींच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचा फारच अभिमान व कौतुक वाटत आहे.

सुरेश वालीशेट्टी हे कर्नाटकातील निपाणीचे! निपाणीतून त्यांनी बीएस्सी पूर्ण केले. एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीही केली; परंतु सळसळत्या रक्ताच्या या तरुणाचे तेथे काही मन रमले नाही. ते महाराष्ट्रात येऊन पोलीस दलात (1977 साली) फौजदार म्हणून भरती झाले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. जातीय दंगल, अंडरवर्ल्ड, दहशतवाद आदी आव्हानांचा सुरेश वालीशेट्टी यांनी अगदी निर्भयपणे यशस्वी सामना केला. त्यामुळे राष्ट्रपतींनी त्यांचा 4 राष्ट्रपती पदपं बहाल करून गौरव केला.

भायखळय़ाच्या दगडी चाळीत याच अधिकाऱ्याने 1991 च्या सुमारास मुंबई गुन्हे शाखेचे तत्कालीन सहपोलीस आयुक्त अरविंद इनामदार यांच्या नेतृत्वाखाली छापा मारून अरुण गवळी, तान्या कोळी, दिलीप कुलकर्णी आदी आघाडीच्या गुंडांना मोठय़ा शस्त्रसाठय़ासह अटक केली होती. त्यात स्टेनगनही होती. मुंबई क्राइम ब्रँचच्या छाप्यात प्रथमच एक अत्याधुनिक ‘गन’ सापडली होती. महाराष्ट्रात गाजलेल्या जे. जे. हत्याकांडातील भिवंडीचा नगराध्यक्ष जयंत सूर्यराव या आरोपीला सुरेश वालीशेट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता अटक केली होती. लहान मुलाचे अपहरण करून त्याची हत्या करणाऱ्या, खंडणी, अपहरण आदी गंभीर गुन्हय़ांत सहभागी असलेल्या अनेक गुंडांचा वालीशेट्टी यांनी चकमकीत खात्मा केला. त्यामुळेच ते शौर्यपदकास पात्र ठरले. अशा या अधिकाऱ्याने देशभरातील शौर्यपदक विजेत्या अधिकाऱ्यांसाठी, कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या व मरणोत्तर शौर्यपदकाने गौरविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या वीरपत्नींना, त्यांच्या कुटुंबीयांना सरकारी सवलती व दरमहा पेन्शन मिळावी म्हणून आपल्या निवृत्तीनंतरही प्रयत्न सुरू केले. आजही ते करीत आहेत.

सेवानिवृत्त झाल्यानंतरही 1993 च्या बॉम्बस्पह्ट तपासाच्या खटल्यासाठी शासनाने या अनुभवी, हुशार अधिकाऱ्याची नेमणूक केली. त्यामुळेच न्यायालयाने 100 आरोपींना दोषी तर 10 आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावली. या तपास प्रक्रियेत वालीशेट्टी यांचा मोलाचा वाटा होता. असा हा कर्तव्यकठोर अधिकारी निसर्गप्रेमी व ग्रंथप्रेमीही आहे. गेली अनेक वर्षे ते वृक्षारोपण, त्यांचे संगोपन करीत आहेत. त्यांना पर्यावरणाची जाणीव व बागकामाची, झाडांची आवड आहे. स्वतः हॉर्टिकल्चरचे प्रशिक्षण घेतलेल्या या अधिकाऱ्याने डाळिंब, संत्री, मोसंबी, करवंद, लिंबू, चिकू इत्यादी बोन्साय केलेल्या झाडांचे मरीन लाईन्स येथील पोलीस जिमखान्यात प्रदर्शनही भरवले होते. असा हा अधिकारी ग्रंथप्रेमीही आहे. ‘वाचाल तर वाचाल’ या अमूल्य संदेशाने भारावून गेलेल्या सुरेश वालीशेट्टींनी पोलीस दलात असताना अनेक पोलीस ठाण्यांत वाचनालये सुरू केली होती. वाचनाची सवय असलेला माणूस सुसंस्कृत बनतो, असे समजले जाते. पोलिसांनीही ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’प्रमाणे सुसंस्कृत व्हावे, हा त्यामागे वालीशेट्टी यांचा उद्देश होता. अशा या सुसंस्कृत अधिकाऱ्याला सलाम!

[email protected]