रंगनाटय़ – अव्यक्ततेचे धगधगीत वास्तव…

>> राज चिंचणकर

सहज उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या संवेदनांना रंगमंचावर मूर्त स्वरूप देणारे नाटक.

रंगमंचावर नाटक रंगत असताना समोरून आपसूक ‘टाळी पडणे’ हे त्या नाटय़कृतीचे यश मानले जाते. ‘छिन्न’ हे नाटक मात्र याला अपवाद आहे, पण हीच या नाटकाला मिळणारी खरी पावती आहे. याचे कारण म्हणजे मानवी मनातल्या अव्यक्ततेचे धगधगीत वास्तव रंगमंचावर मांडताना हे नाटक इतका सुन्न करणारा अनुभव देते की, टाळी देण्याचे भानच राहत नाही. साडेचार दशकांपूर्वी ‘छिन्न’ या नाटकाने रंगभूमीवर प्रथम पाऊल टाकले आणि आता पुन्हा नव्या नटसंचात हे नाटक रंगभूमीवर अवतरले आहे. वास्तविक सध्याचे मुक्त जीवनमान लक्षात घेता ‘छिन्न’ या नाटकातला विषय तसा जुनाच म्हणावा लागेल. मात्र मानवी मनाची आंदोलने काळाच्या ओघातही तशीच असल्याने हा विषय आजही ताजा वाटतो आणि सहजी उघडपणे न बोलल्या जाणाऱया संवेदनांना तो रंगमंचावर मूर्त स्वरूप देतो.

मानसिक व शारीरिक जाणिवा, प्रसंगी कोणत्या थराला जाऊ शकतात याचे प्रकटीकरण करत, नातेसंबंध ढवळून काढणारे भेदक वास्तव या नाटकात दृगोच्चर झाले आहे. नाटककार वामन तावडे यांनी त्याकाळी एक अबोल विषय हाती घेत दोन स्त्रियांच्या अंतर्मनातली घुसमट त्यांच्या लेखणीद्वारे सिद्ध केली आहे. यात नाटककाराची लेखणी थेट भाष्य करत जाते. त्याअनुषंगाने हे नाटय़ मंचित करणे म्हणजे तारेवरची कसरतच आहे. जरा कुठे तोल ढळला तरी नाटकाचे मार्पामण वेगळय़ा दिशेने होण्याची शक्यता अधिक असतानाच हा तोल सक्षमपणे सांभाळण्याची जबाबदारी दिग्दर्शक अभय पैर यांनी आत्मविश्वासाने निभावून नेली आहे. यातले नाटय़ त्याची पातळी सोडणार नाही याचे व्यवधान राखतानाच, त्यातला आशयही उणावणार नाही याची दक्षता घेत दिग्दर्शकाने या नाटकाचे बांधकाम केले आहे.

अशा प्रकारचा धगधगीत विषय रंगमंचावर सादर करताना कलाकारांचा कस लागणे ाढमप्राप्तच आहे. नाटकात ‘सिंधू’ हे पात्र साकारणाऱया पूजा नायक यांचा कायिक व वाचिक अभिनय, संहितेतल्या ‘बिटवीन द लाइन्स’मधले भाव प्रकट करतोच, परंतु त्याचबरोबर त्यांचे डोळेही प्रकर्षाने बोलत राहतात. स्वरातले आरोह-अवरोह आणि नजरेचा परिणामकारक वापर करत त्यांनी ही ‘सिंधू’ कमालीच्या ताकदीने उभी केली आहे. अशी ही आव्हानात्मक भूमिका स्वीकारलेल्या पूजा नायक यांच्यातली प्रगल्भ अभिनय कला यातून रंगमंचावर प्रतिबिंबित झाली आहे.

नाटकात दुसरी महत्त्वाची भूमिका आहे ती ‘शालू’ या पात्राची. ही भूमिका साकारणारी युवा अभिनेत्री कांचन प्रकाश हिने तिला मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेतला आहे. भूमिका सक्षमपणे पेलत, नाटय़ावकाशातला समतोल साधत पात्र उठावदार करणे हे सोपे काम नाही. मात्र कांचन प्रकाशने यात जीव ओतला आहे. हे पात्र तिच्या देहबोलीतून ठसत असतानाच साध्या हाताच्या बोटांच्या नजाकतीतूनही ती तिचे म्हणणे अधोरेखित करत जाते. शाळकरी मुलगी ते विवाहित स्त्राr अशी अभिनयाची रेंज दाखवताना तिने केलेला अभ्यास तिच्या अस्तित्वातून ठळकपणे जाणवत राहतो. सिंधू आणि शालू या दोघींमध्ये निर्माण होणारे ताणतणाव, असूया, वाद, संघर्ष हे सर्व काही ‘छिन्न’ या नाटकाचा केंद्रबिंदू आहे आणि पूजा नायक व कांचन प्रकाश या दोघींनी तो कमालीच्या ताकदीने रंगमंचावर आविष्कृत केला आहे.

नाटकातले सहकलाकारही त्यांच्या भूमिकांमध्ये पार समरस झालेले दिसून येतात. अभय पैर (आप्पा), अभिजीत धोत्रे (श्रीकांत) यांच्यासह नवसाजी कुडव, चैतन्य म्हात्रे, अनिकेत वंजारे, सुगत उथळे, चंद्रशेखर मिराशी, निकिता सावंत, सृष्टी शेलार, ऐश्वर्या पाटील, प्रतीक ठोंबरे या कलाकारांमधली वास्तव जगणारी पात्रेही तितक्याच सडेतोडपणे स्वतचे अस्तित्व नाटकात ठसवत जातात आणि त्यायोगे हे नाटक अगदी आतून बोलत राहते.

नाटकाची तांत्रिक अंगे रंगमंचीय अवकाशात अचूक फेर धरत यातले नाटय़ अधिक प्रभावी करतात. नेपथ्यकार प्रदीप पाटील यांनी बारीकसारीक तपशिलासह उभारलेली चाळीतली खोली, बिपीन वर्तक व नंदलाल रेळे यांचे संगीत, श्याम चव्हाण यांची बोलकी प्रकाशयोजना नाटकातले वास्तव अधिकच गडद करतात. उदयराज तांगडी यांची रंगभूषा व अनिकेत वंजारे यांची वेशभूषा नाटकातल्या पात्रांचे अस्तित्व ठसठशीत करतात. व्ही. आर. प्रॉडक्शन प्रस्तुत, व्यासपीठ (मुंबई) व यशवंत थिएटर या संस्था आणि निर्माती वैशाली गोसावी यांनी सादर केलेले हे नाटक मनाला थेट भिडत वास्तवतेची दाहक अनुभूती देत जाते.
 [email protected]