लेख – भारतीय नौदलाचे सामर्थ्य वाढविण्याची गरज

फाईल फोटो

>> जयेश राणे,  [email protected] 

चीनच्या नौदलाचेच काय, तर वायू आणि सैन्यदलाचे सामर्थ्यही भारताच्या तुलनेत कायमच उजवे राहिले आहे. त्यामुळे भारत त्या बलाढय़ देशाचा सामना कसा करणार ? हा प्रश्न आहे. भारत स्वतःच्या संरक्षण दलांची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. मात्र हा वेग वाढला पाहिजे असेच मनोमन वाटते. कारण बलाढय़ चीनची मस्ती वाढण्यास त्याच्या संरक्षण दलांची ताकद तर कारणीभूत आहेच, शिवाय सायबर चाचेगिरीतील लबाडीही त्याच्या बलस्थानात भर टाकत आहे.

भारताची तिन्ही संरक्षण दले म्हणजे भारताची शान आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास कायम वाढत कसा राहील याअनुषंगाने कायम प्रयत्न झाले पाहिजेत. या दलांच्या आत्मविश्वासात वाढ निर्माण होण्यासाठी त्यांना भारताच्या इतिहासात घेऊन जाणे अनिवार्य ठरते. त्याचाच परिपाक म्हणून की, काय नौदल दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अशा 43 फूट उंच पुतळ्याचे (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर) आणि नौदलाच्या ध्वजावरील राजमुद्रेचे अनावरण गेल्या महिन्यात नौदल दिवसानिमित्त पंतप्रधानांच्या हस्ते झाले. अर्थात हे ठीक असले तरी आपल्या शेजारी काय चालू आहे ? याकडेही तितकेच लक्ष असणे अत्यावश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाचा पाया रचला. सध्या भारतीय नौदलाच्या पदांचे भारतीय संस्कृतीनुसार होणारे नामकरण कौतुकास्पद आहे. कारण गुलामगिरीची जोखड बाजूला फेकणे आणि स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत ताठ मानेने जगणे म्हणजे काय? याचा आदर्श पाठ छत्रपती शिवरायांनी घालून दिला आहे. जगातील विविध देशांना महाराजांची ओळख आहेच. मात्र त्यांची कीर्ती अधिक पसरवण्यासाठी आणि ते नक्की कोण होते? ही जिज्ञासा जगाच्या मनी निर्माण करण्यासाठी पदांचे भारतीयीकरण करणे महत्त्वाचे वाटते. भारत हा स्वतंत्र देश आहे. त्याला त्याच्या वंदनीय, आदर्श व्यक्तींचे कार्य डोळ्यांसमोर ठेवून वाटचाल करायची असेल तर त्यात चूक असे काहीच वाटत नाही. उलटपक्षी जगाला नौदलाचे खरे संस्थापक कोण आहेत? हे भारताकडून सांगण्यात विलंबच झाला,  भारतीय नौदलाच्या गणवेशावर राजमुद्रा असणार आहे. यानिमित्ताने सांगावेसे वाटते की, छत्रपती शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी नौदलातील नौसैनिक, अधिकारी यांच्याकडून प्रयत्न झाले पाहिजेत. तरच त्यांना त्यांचे महत्त्व अधिक सखोलपणे मनावर बिंबण्यास नक्कीच सहाय्य होईल. अन्यथा त्याकडे केवळ गणवेशात झालेला एक पालट म्हणून संकुचितपणे पाहिले जाईल. ‘जुने तेच सोने’ असे म्हटले जाते. आता हे जुनेपण कायम सोन्याप्रमाणे झळाळी असणारे राजमुद्रारूपी सूत्र गणवेशाच्या माध्यमातून धारण करण्यास मिळणार आहे. त्याचे सार्थक व्हावे. ते करण्याचे दायित्वच भारतीय नौदलकडे आलेले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नसताना गडकोट – जलदुर्ग बांधले. नौदलाचा केवळ पायाच रचला नाही, तर समुद्रावर भक्कम वर्चस्व निर्माण केले. आता तर तंत्रज्ञान पुष्कळ प्रगत झाले आहे. म्हणजे भारत महाराजांच्या ज्ञानाचा आणि आताच्या प्रगत तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करतो आणि सागरावर वर्चस्व प्रस्थापित करतो हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे. त्याची चुणूक आगामी काही वर्षांत जगाला दिसावी.

जागतिक स्तरावरील आव्हानांचा निकराने सामना करण्यासाठी भारतीय नौदलाला आधुनिकतेची कास धरण्यास पर्याय नाही. तत्कालीन सरंक्षणमंत्री आणि गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भारताच्या संरक्षण दलांचे आधुनिकीकरण करण्यासाठी चांगले प्रयत्न केले. लोकप्रतिनिधी तंत्रज्ञान क्षेत्रातील असल्यास आणि त्याच्याकडे त्याच्या क्षमतेला पूरक असे खाते असल्यास त्याला कसा न्याय देता येतो हे पर्रीकर यांच्या कारकीर्दीत देशाने अनुभवले.

अर्थात, भारताच्या तुलनेत शेजारील चीन हा अत्यंत सामर्थ्यशाली तर आहेच, पण तो केवळ या ताकदीवरच विसंबून नाही, तर भारत समुद्रात नव्याने कुठे काही करत आहे का ? यावरही सतत लक्ष ठेवून आहे. त्यासाठी त्याने गेल्या काही वर्षांपासून श्रीलंकेच्या बंदरांचा उपयोग करण्यास आरंभ केला आहे. वर्षभरात विविध युद्धनौका – पाणबुडय़ा श्रीलंकेच्या बंदरावर कशा येत राहतील याची चोख व्यवस्था चीनने केली आहे. चीन आणि श्रीलंका या देशांतील समुद्र स्तरावरचा प्रवास पुष्कळ मोठा आहे. मात्र तरीही तो प्रवास करून भारताची माहिती मिळवण्यासाठी चीनची कायम चालू असलेली धडपड लक्षवेधी आहे. भारताच्या समुद्र परिसरात कोणकोणती खनिज संपत्ती आहे  तसेच उद्या भारताशी खटका उडाल्यास भारतावर दबाव निर्माण करण्यासाठी, त्याची नाकेबंदी करण्यासाठी कुठल्या भागात तत्परतेने युद्धनौका – पाणबुडय़ा तैनात करता येतील या दृष्टीने सागरी मार्गाचा नकाशा असणे आवश्यक आहे. हे लक्षात घेता चीन सतत भारताच्या सभोवती असणाऱ्या समुद्राच्या सहाय्याने भारताविषयीची माहिती संकलित करून ठेवण्यास अनन्यसाधारण महत्त्व देत आहे हे दुर्लक्षित करून चालणार नाही.

युद्धनौकेवरून करण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी करण्याच्या काही दिवस आधी चीन त्याची युद्धनौका त्या चाचणी क्षेत्रात तैनात करतो. त्यामुळे भारताला एकदा क्षेपणास्त्र चाचणी रहित करावी लागली आहे. सदर क्षेपणास्त्र किती पल्ला गाठते, किती कालावधीत लक्ष्याचा भेद करते  इत्यादी माहिती संकलित करण्याकडे या माध्यमातून असलेला कल लपून राहत नाही. चीन भारताच्या समुद्रकिनारी करत असलेली हेरगिरी, त्याचे मनसुबे नक्कीच चांगले नाहीत.

श्रीलंकेच्या बिकट आर्थिक काळात भारताने  श्रीलंकेस भरघोस सहाय्य केले आहे. मात्र त्या बदल्यात त्या देशाकडून भारताने कधीच कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. चीनकडून कर्ज घेणाऱ्या श्रीलंकेचा पुरेपूर उपयोग चीन करत आहे. श्रीलंकेच्या बंदरांवर स्वतःच्या युद्धनौका – पाणबुडय़ा यांना इंधन कसे मिळेल, पाहिजे तितका कालावधी तिथे वास्तव्य कसे करता येईल  यासाठी चीन श्रीलंकेचा व्यवस्थित उपयोग करून घेत आहे. चीनच्या भीतीपुढे दबलेली श्रीलंका भारताच्या निषेधाला दुर्लक्षित करून चीनला अनुकूल असेच वागत आहे.  भारताच्या सभोवती असणाऱ्या देशांवर चीनची कशी मजबूत पकड आहे याची ही एक छोटी झलक म्हणावी लागेल. केवळ नाममात्र असलेले शेजारी देश काय उपयोगाचे? जे भारताकडून सहाय्य घेतात, मात्र चीनपुढे झुकतात. चीनच्या नौदलाचेच काय, तर वायू आणि सैन्यदलाचे सामर्थ्यही भारताच्या तुलनेत कायमच उजवे राहिले आहे. त्यामुळे भारत त्या बलाढय़ देशाचा सामना कसा करणार ? हा प्रश्न आहे. भारत स्वतःच्या संरक्षण दलांची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. मात्र हा वेग वाढला पाहिजे असेच मनोमन वाटते. कारण बलाढय़ चीनची मस्ती वाढण्यास त्याच्या संरक्षण दलांची ताकद तर कारणीभूत आहेच, शिवाय सायबर चाचेगिरीतील लबाडीही त्याच्या बालस्थानात भर टाकत आहे. वाढते सायबर हल्ले हा जागतिक स्तरावर डोकेदुखीचा विषय ठरला आहे. शस्त्राविना बुद्धिचातुर्याने लढण्यात येणारे हे युद्ध तापदायकच आहे.