ठसा – ज्युनियर मेहमूद

>> दिलीप ठाकूर

ज्युनियर मेहमूदचे अखेरच्या दिवसांतील आजारपण, त्याचा कर्करोग चौथ्या टप्प्यात असल्याचे धक्कादायक वृत्त, त्याची खंगत चाललेली तब्येत हे सगळेच क्लेशदायक वाटत होतं. अखेर 8 डिसेंबरची सकाळ त्याच्या दुःखद बातमीने उजाडली. ज्युनियर मेहमूद ‘नम्मू’ नावाने चित्रपटसृष्टीत परिचित होता. जन्म 15 नोव्हेंबर 1956 रोजीचा. नाव नईम सय्यद. त्याचा मोठा भाऊ हिंदी चित्रपटसृष्टीत स्टिल फोटोग्राफर म्हणून वावरत असतानाच तो घरी शूटिंगच्या गमती जमती सांगत असे, तर कधी नम्मू त्याच्या सोबत लहानपणी जात असे.

असाच ‘मोहब्बत जिंदगी है’ या चित्रपटाच्या सेटवर हे दोघे असताना एक बालकलाकार रिटेकवर रिटेक घेत असल्याचे पाहून नम्मू पुटपुटला, ‘‘हे मी करू शकतो.’’ दिग्दर्शकाने नम्मूला सांगितले, ‘‘तू हा प्रसंग करून दाखव बघू. त्याने एक-दोन केलेल्या चुका दोन-तीन टेकमध्ये सुधारल्या आणि नम्मूच्या रूपाने एक बालकलाकार जन्माला आला. त्या सुमारास सचिन पिळगावकर, मा. सत्यजित, मा. अलंकार, महेश कुमार (अर्थात महेश कोठारे) असे अनेक बालकलाकार कार्यरत होते. त्यात मग मा. राजू, मा. मयूर वगैरे आले आणि प्रत्येकाला लहानमोठी संधी मिळत होती. विनोदी अभिनेता मेहमूदने नम्मूला ज्युनियर मेहमूद असे नाव दिले. उर्दूमिश्रित हिंदी भाषेची उत्तम जाण, नृत्याची आवड, चुणचुणीतपणा आणि एक स्वाभाविक धिटाई या गुणांवर ज्युनियर मेहमूदला चित्रपट मिळू लागले. त्याचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट, ‘मोहब्बत जिंदा है’, त्यानंतर ‘सुहागरात’, ‘नौनिहाल’, ‘वासना’, ‘संघर्ष’, ‘परिवार’, ‘फरिश्ता’, ‘विश्वास’, ‘प्यार ही प्यार’, ‘चंदा और बिजली’, ‘कटी पतंग’, ‘आन मिलो सजना’, ‘अंजाना’, ‘राजासाब’ वगैरे बरेच, पण यातही ‘ब्रह्मचारी’, ‘बालक’, ‘बचपन’, ‘घर घर की कहानी’ या चित्रपटांत बालकलाकार म्हणून भरपूर वाव मिळाला.

‘ब्रह्मचारी’मधील शम्मी कपूरसोबतच्या अकरा बालकलाकारांत ज्युनियर मेहमूद लक्षवेधक ठरला. त्या काळात त्याच्या वडिलांना मासिक 320 रुपये पगार होता, तर ज्युनियर मेहमूद दिवसाला तीन हजार मानधन मिळवी. आजचे ते तीन लाख ठरावेत. त्याने याच आपल्या चलतीच्या काळात इम्पाला गाडी घेतली. त्याला पडद्यावर नृत्यगीत साकारण्याचीही संधी मिळाली. त्यासाठी ही मोठीच गोष्ट. ‘ऐसा बनूंगा अॅक्टर मैं यारो’ (घर घर की कहानी’), ‘अरे घर को मन’ (‘छोटी बहू’), ‘लगे कोई लॉटरी’ (‘रिवाज’), ‘हम ही जाने’ (‘एक नारी दो रूप’), ‘शर्म तुमको न आये’ (‘तनहाई’), ‘ना कोई पैसा ना दिल’ (‘बन्सी बिरजू’) याबरोबर ‘गुमनाम’मध्ये ‘हम काले है तो क्या हुवा दिलवाले है’ हे मेहमूदचं गाणं अगदी त्याच रंगाढंगात ज्युनियर मेहमूदने साकारल्यावर त्याला इव्हेन्टस्मध्ये संधी मिळत गेली. एव्हाना अन्य भाषांतील चित्रपटांतही भूमिका साकारत राहिला. या सगळ्या गडबडीत आणि यशात तो कायमच ‘ज्युनियर मेहमूद’च राहिला. त्याच्या बरोबरचा सचिन पिळगावकर वयात येताच ‘गीत गाता चल’पासून नायक झाला, पण ज्युनियर मेहमूदने आपल्या वाटय़ाला आलेले काम चोख करत स्वतः आनंद घेतला, इतरांनीही दिला.

या प्रवासात त्याला जॉनी लिव्हर, बिरबल असे अनेक मित्र मिळाले.  वयात आल्यावर ‘गीत गाता चल’, ‘अखियों के झरोखो से’, ‘आज का अर्जुन’, ‘खून और कर्ज’, ‘रामगढ के शोले’, ‘बेवफा सनम’ इत्यादी चित्रपटांतून भूमिका साकारली. मराठी, पंजाबी, आसामी यांसह तब्बल सात भाषांतील चित्रपटांत कामे केली. ‘भौनी’ (आसामी), ‘मा दा लाडला’ (पंजाबी), ‘लाडो’ (पंजाबी) हे त्याचे अन्य भाषिक चित्रपट. ‘अदलाबदली’, ‘मस्करी’ असे  तीन मराठी, दोन पंजाबी व एका ‘आसामी’ चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले. ‘प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘तेनाली रामा’ अशा हिंदी मालिकांत काम केले. सतत कार्यरत राहिला. बदलत राहिलेल्या चित्रपटसृष्टीत तो आपली वाटचाल करत राहिला. एकूण 265 चित्रपटांत त्याने भूमिका साकारली. बराच काळ तो रंगभूमीवर ‘ज्युनियर मेहमूद नाईट्स’ हा कार्यक्रम करीत असे. त्याचा शेवट मात्र अतिशय दुःखदायक झाला. आपल्यासोबत काम करणाऱ्यांनी आपल्याला भेटावयास यावे असं त्याला वाटणं स्वाभाविक होते. यात त्याची माणसांबद्दलची ओढ दिसते. ती आता कायमची थांबली आहे.

[email protected]