विज्ञान-रंजन – छोटय़ा पडद्याची कहाणी

>>विनायक

आमच्या  देशात टेलिव्हिजन आला 1959 मध्ये दिल्लीत. तोसुद्धा अगदी मर्यादित भागांत चित्रवाणीचं प्रक्षेपण करणारा प्रयोग होता. त्यासाठी प्रशिक्षण घ्यायला जी मंडळी इंग्लंडला गेली होती त्यात विख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे हेसुद्धा होते. प्रत्येक माध्यमाचं तंत्रज्ञान आणि सादरीकरण याची विशिष्ट  पद्धत असते. एकाच प्रकारच्या माध्यमाचं स्वरूप बदललं तरी त्यात आवश्यक ती सुधारणा करावी लागते. चित्रपट आणि चित्रवाणी ही माध्यमं प्रेक्षकांना सारखीच वाटत असली तरी त्याद्वारे होणाऱ्या कार्यक्रमाच्या निर्मितीमध्ये फरक असतो.

उदाहरणार्थ, मोठय़ा पडद्यावरचा ‘लाँग शॉट’ (दूरचं दृश्य) स्पष्ट दिसतो. छोटय़ा पडद्यावर ते फारच लहान वाटेल वगैरे. शिवाय  छोटय़ा पडद्यावरचे बरेच कार्यक्रम स्टुडिओत होतात. मालिकांमध्ये आऊटडोअर (बाह्य) चित्रण दिसलं तरी ‘क्लोज अप’कडे नेणारं असतं. मोठय़ा पडद्यावर अनेक रिटेक करून किंवा सीन पुनः पुन्हा चित्रीत करून सुयोग्य करता येतो. टीव्हीच्या थेट प्रक्षेपणात गफलत झाली तर ती लगेच प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. टीव्ही नुकताच सुरू झाला तेव्हा निवेदक-निवेदिका बातम्या लाइव्ह वाचताना एका हाताने माश्या उडवत असल्याचं दृश्य हा एकेकाळी चेष्टेचा विषय झाला होता. काही वेळा निवेदनातच गडबड होऊ शकते. एका प्रसिद्ध साहित्यिकाने एका प्रसिद्ध कवीचा परिचय करून देताना अनवधानाने दुसऱ्याच कविवर्यांचं नाव घेतलं आणि ओशाळून दुरुस्ती केली. याचं कारण ती पिढी मुळात अशा प्रसारणाला सरावलेली नव्हती.

1987 मध्ये एका टीव्ही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची वेळ आली तेव्हा कॅमेऱ्याकडे पाहत दूरवरच्या प्रेक्षकांशी गप्पा करीत असल्याचा अनुभव आम्हीही घेतला आहे. रेडिओवर केवळ आवाजातून आपली भावना कलाकारांना श्रोत्यांपर्यंत पोहोचवावी लागते. तीही गोष्ट किती कठीण आहे हे प्रात्यक्षिकासह नीलम प्रभू (करुणा देव) सांगायच्या. बबन प्रभू तर मिश्कील. ते एका त्यांच्या खास शैलीत म्हणाले होते, ‘‘अहो, मीसुद्धा टीव्हीवर काम  करतो, पण टीव्हीचा एक दोष आहे. त्यावर ‘दिसतं!’’ आणि ते स्वतःच खळाळून हसले. त्यात आपले ‘दोष’ही दिसतात असं त्यांना म्हणायचं होतं. अर्थातच 1972 मध्ये मुंबईत टीव्ही अवतरल्यानंतरचा तो आरंभीचा काळ होता. आता ही माध्यमं खूपच सक्षम आणि निवेदक, सूत्रसंचालक त्यांचं काम सफाईदारपणे करतात.

संपूर्ण कॅमेऱ्याचं एकाच कॅमेऱ्याने चित्रण करण्याच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांवर कॅमेरा रोखला तेवढय़ात त्यांनी जांभई दिली. अशा ‘फनी’ गोष्टी जगभर घडल्या असतील. एकेणिसाव्या शतकाने आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धाने विज्ञान अनेक मार्गांनी घराघरात आणलं. रेडिओ, टीव्ही, पंखा, एसी, इस्त्री, शिलाई यंत्र, स्वयंपाकघरातील यंत्रे आणि शेतीची यंत्रंसुद्धा. या सगळय़ांतून माणसाचे श्रम थोडे कमी झाले, पण अवधानं म्हणजे लक्षात ठेवण्याच्या गोष्टी वाढल्या. मनगटी घडय़ाळापासून  आता मोबाईलपर्यंत सगळं वेळीच चार्ज करावं लागतंच की! पूर्वी घडय़ाळाला चावी देणं लक्षात ठेवावं लागायचं. आता सेल बदलण्याचं वेळापत्रक ठरवावं लागतं इतकंच.

रेडिओ जगभर प्रसारण करू लागला आणि लगेच टीव्ही म्हणजे टेलिव्हिजनच्या संकल्पनेवर जगात संशोधन सुरू झालं. घरबसल्या कार्यक्रम, बातमीपत्र पाहता येईल ही संकल्पनाच त्या वेळी रोमांचकारी होती. 1920 मध्ये या प्रयोगांना गती आली. कॅथोड रे टय़ूबद्वारे प्रकाशकणांचं फोटो इलेक्ट्रिक लहरीत रूपांतर आणि टीव्ही सेटवर त्याचं ग्रहण करताना पुन्हा प्रकाश चलचित्रात होणारा बदल यातून टीव्ही केंद्रातले कार्यक्रम घरोघरी पोहोचू लागले. आता तो प्रवास एलईडी पडद्यापर्यंत पोहोचला आहे. पहिल्या कृष्णधवल प्रसारणातील एका महिलेचं बोलणं प्रसारित झाल्याचा काही क्षणांचा व्हिडीओ आजही पाहता येतो.

अनेक संशोधकांच्या विचारांतून जन्मलेल्या दूरचित्रवाणीचा जनक मात्र जॉन बर्ड या स्कॉटिश संशोधकाला मानलं जातं. अवघ्या 47 वर्षांच्या आयुष्यात त्याने विविध वैज्ञानिक प्रयोग केले. ग्रॅफाईटपासून हिरे बनविण्याचा त्याचा प्रयोग सपशेल फसला, पण टीव्ही प्रसारणाने यश दिलं. 1925 मध्ये जॉन यांनी लंडनच्या  सेल्फिजेस स्टोअरमध्ये मर्यादित प्रसारण करून दाखवलं. 1927 मध्ये मात्र लंडनपासून सुमारे हजार किलोमीटर असलेल्या ग्लॅस्गो येथे टीव्ही प्रसारण पाहता आलं. प्रगतीचा हा वेग विलक्षण होता. 1930 मध्ये ब्रिटिश प्रधानमंत्री मॅकडोनॅल्ड आणि राजा जॉर्ज यांचंही भाषण प्रेक्षकांनी पाहिलं. त्याच वेळी अमेरिकेत वॉशिंग्टन ते कॅलिफोर्निया या सुमारे 4000 किलोमीटर अंतरावर टीव्ही प्रसारण झालं. 1954 मध्ये अध्यक्ष आयसेनहॉवर यांच्याशी संवाद प्रसारित झाला. तो सुरू असताना निवेदकाने ‘‘आता बटण  दाबून रंगीत प्रसारण सुरू करतो’’ असं म्हटलं आणि पुढचा कार्यक्रम रंगीत दिसू लागला (अशीच कल्पना व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ चित्रपटाच्या आरंभी आहे).

मुंबईत 2 ऑक्टोबर 1972 रोजी झालेलं पहिलं टीव्ही प्रसारण आम्ही कॉलेजमध्ये पाहिलं होतं. त्या वेळी टीव्ही बातम्यांपुरता मर्यादित होता. सिनेमाची पूर्वचित्रित गाणी ‘छायागीत’ म्हणून सादर व्हायची. ती पाहायला एका घरी शेजाऱ्यापाजाऱ्यांची गर्दी उसळायची. 1982 मध्ये हिंदुस्थानच्या ‘एशियाड’ खेळांच्या निमित्ताने रंगीत टीव्ही असावा हा ध्यास तत्कालीन केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री वसंत साठे यांचा होता. तेव्हापासून देशात कलर टीव्हीचं युग सुरू झालं. मात्र रंगीत प्रसारण होईपर्यंत साठे यांचं खातं बदलण्यात आलं होतं. रंगीत टीव्ही आल्यावर ‘जरा जपून, रंग ओला आहे’ अशी मिश्कील व्यंगचित्रंही प्रसिद्ध झाली. तीन टय़ूबचे मोठे टीव्ही सेट जाऊन एलईडी, थ्रीडी टीव्हीही आले आणि आता तर सारंच मोबाईलवर दिसतं. आपल्या नकळत आपण विज्ञानवाही होतो ते असे, पण थोडं विज्ञानवाही होऊन त्यामागचं इंगित समजून घेतलं तर अधिक आनंद वाटेल.