Lok Sabha Election 2024: संविधान बदलण्याचा भाजपचा कट; तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

संविधान बदलण्याच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे लक्ष्य आरक्षण संपविणे आहे. भाजपला संविधान बदलायचे  आहे. भाजप नेत्यांकडून संविधान बदलण्याच्या गोष्टी केल्या जात आहेत. त्यामुळे भाजपचा पराभव ही देशाची गरज असल्याची टीका तेजस्वी यादव यांनी केली आहे.

तेजस्वी यादव यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर भाजपवर हल्लाबोल केला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हा पवित्र ग्रंथ आहे. भाजपचे नेते आणि उमेदवार या पवित्र ग्रंथाला नष्ट करू पाहत असल्याने संविधान बदलण्यासाठी एकाच सुरात बोलत आहेत. तर पंतप्रधान अशा उमेदवारांवर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यासाठी मतं मागत आहेत’, अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली.

‘कोणी संविधान बदलण्याच्या बाता मारत आहे, तर समजून जा की ते तुमच्या अधिकारांवर गदा आणत आहेत. संविधान बदलून ते वंचित, उपेक्षित, गरीब लोकांचे आरक्षण संपवतील. संविधान बदलल्याने लोकांना जनकल्याण योजना, नोकऱ्या आणि शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. भाजपच्या लोकांचे हेतू चांगले नाहीत’, असाही आरोप त्यांनी केला आहे. तसेच 10 वर्षांत त्यांनी महागाई, गरीबी आणि बेरोजगारी केलीच. त्यात आता संविधान बदलण्याचा कट रचत आरोपही तेजस्वी यादव यांनी केली. ‘मतभेद विसरून सर्वांना एकजुटीने भाजपचा पराभव करायचा आहे. भाजपचा पराभव ही देशाची गरज आहे, अन्यथा हे लोक लोकशाही आणि संविधान संपवतील’, असा हल्लाबोल तेजस्वी यादव यांनी केला.