भाजप महाराष्ट्राला यूपी, बिहारच्या वाटेवर नेत आहे

मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री ते जर गुंडाकडून फुले आणि सन्मान घेत आहेत. गुंड मंत्रालयात येताना रील करत आहेत. यावरून गुंडांना भीती राहिलेली नाही असे सिद्ध होते. दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या जात आहेत. हे बघितल्यावर भाजप महाराष्ट्राला बिहार आणि यूपीच्या वाटेवर नेत असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला.

दिल्लीसमोर महाराष्ट्र कधीही झुकला नाही, पण  इथले नेते दिल्ली वाऱ्या करतात, मागण्या करतात. त्या ऐकल्या जात नाहीत. नेत्यांनी दिल्लीत जाऊन झुकणे किती योग्य आहे असा प्रश्न जनतेला पडला आहे. याची चिड जनतेत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील उमेदवार निवडून येतीलच, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. राज ठाकरे यांनी मागील निवडणुकीत भाजपविरोधात सामान्यांच्या बाजूने भाषणे केली, बेरोजगारीचा प्रश्न उचलून धरला. ते जर भाजपसोबत जात असतील आणि दिल्लीसमोर झुकत असतील तर ते लोकांना आवडणारे नाही.  राज्यातील पाणीटंचाईकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत. सन 2011 च्या लोकसंख्येनुसार पाण्याचे टँकर दिले जाणार आहे, त्यामुळे ते पाणी कसे पुरणार? काही संघटनांची टँकर देण्याची तयारी आहे तर सरकार आचारसंहितेचे कारण सांगत आहे. सरकार कमी पडत असताना संघटनांनादेखील थांबविले जात आहे. मग सामान्य लोकांना पाण्याविना मरू द्यावे का, असा संतापही रोहित पवार यांनी व्यक्त केला.