मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मंचरमध्ये कॅन्डल मार्च; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मंचर शहरात उपोषण सुरू आहे. रविवारी सायंकाळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे शहरातून कॅन्डल मार्च काढला. त्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी मंचर शहरात कॅन्डल मार्च काढण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक मंचर येथून कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. चौडेश्वरी गल्ली, मारुती मंदिर, धर्मवीर संभाजी महाराज चौकमार्गे कॅन्डल मार्च पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला व तेथे त्याची सांगता झाली. कॅन्डल मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे अशा घोषणा देण्यात आल्या. मंचर शहरातही मराठा समाजाच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू लागला आहे.