नेवासाजवळ कार उलटून अपघात; पाच जणांचा मृत्यू

नगर छत्रपती संभाजी नगर राज मार्गावर नेवासाजवळ कार उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. रस्त्यावर पडलेल्या टायरचा अंदाज चालकाला आला नाही, त्यामुळे वेगात असलेल्या गाडीवरील त्याचे नियंत्रण सुटले. कार पुलाचे कठडे तोडून ओढ्यात उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 वर्षांची मुलगी या अपघातातून बचावली आहे.

नगर-छत्रपती संभाजी नगर राजमार्गावर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलाजवळ रविवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृतांमध्ये एका चिमुरडीसह तीन महिला, आणि वाहन चालकाचा समावेश आहे. या अपघातात वसीम हरून मुल्ला (वय 41), अनसुरा बेगम हरून मुल्ला (वय 41) ,रेश्मा हवलदार (वय 35) ,हसिना बेगम हरून पठाण (वय 54) ,सामिया मोमीन हलदार (वय 14, रा. सर्व छत्रपती संभाजी नगर) यांचा मृत्यू झाला आहे. तर मासुमा मोमीन हवलदार (वय13) ही अपघातातून बचावली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह नेवासा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. छत्रपती संभाजीनगर येथील हरून अमीर मुल्ला यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

या तक्रारीत हरून मुल्ला यांनी म्हटले आहे की, नगर छत्रपती संभाजीनगर राजमार्गावर त्रिमूर्ती शैक्षणिक संकुला जवळ रस्त्यावर पडलेल्या टायरला धडकून कार पुलाचे कठडे तोडून ओढ्यात उलटली. चालकाला गाडीच्या वेगावर नियंत्रण राखण्यात यश न आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जुन्नर आळेफाटा येथून नातेवाईकांना भेटून छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना ही घटना घडली.