छत्तीसगडमध्ये 29 नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील हापाटोला जंगल भागातील पोलीस आणि बीएसएफने जहाल नक्षलवादी नेता शंकर रावसह 29 नक्षलवाद्यांचा आज दुपारी चकमकीत खात्मा केला. शंकरसाठी 25 लाखांचे इनाम जाहीर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंकडून जोरदार गोळीबार झालेल्या या चकमकीत बीएसएफचे निरीक्षक रमेश चौधरी यांच्यासह तीन जवान जखमी झाले आहेत.

शंकर, ललिता आणि राजू या जहाल नक्षलवाद्यांचा तळ या भागात पडल्याची खबर मिळाल्यानंतर बीएसएफ आणि जिल्हा पोलीस राखीव दलाच्या संयुक्त पथकाने हापाटोला जंगल भागातील या परिसराला घेराव घातला होता. दुपारी दोनच्या सुमारास हे पथक पुढे सरकत असताना अचानक गोळीबाराला सुरुवात झाली.

एके-47, लाईट मशीन गनमधून गोळीबार

सीमा सुरक्षा दल आणि राज्य पोलिसांचे जिल्हा राखीव रक्षक यांचे संयुक्त पथक लहानबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिनागुंडा आणि कोरोनार गावांदरम्यानच्या हापाटोला जंगलात नक्षलवाद्यांच्या मागावर असताना दुपारी दोनच्या सुमारास या चकमकीला तोंड फुटले. चकमकीत नक्षलवाद्यांनी एके-47 रायफली आणि लाईट मशीन गनचा मारा केला. जखमी झालेल्या तीन सुरक्षा कर्मचाऱयांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मोठा शस्त्रसाठा जप्त

नक्षल ऑपरेशन, पोलीस महानिरीक्षक (बस्तर रेंज) सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून 29 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि एके-47, एसएलआर, इन्सास आणि .303 रायफलींसह मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

तीन दिवसांनी मतदान

नक्षलग्रस्त बस्तर लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला मतदान होणार आहे, तर बस्तर प्रदेशचा एक भाग असलेल्या कांकेर मतदारसंघात 26 एप्रिलला सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱया फेरीत मतदान होणार आहे.