मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने घेतलेली शपथ खरी करून दाखवावी; किरण काळे यांचे आव्हान

राज्य सरकार अजूनही मराठा आरक्षणाबाबत घोषणा करायला तयार नाही. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. त्यांच्या जीवाच काही बरं वाईट झाल तर त्याची सर्व जबाबदारी सरकारवर असणार असेल, असा इशारा नगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवरायांच्या नावाने दसरा मेळाव्यात घेतलेली शपथ टिकणारे आरक्षण जाहीर करून खरी करून दाखवावी, असे जाहीर आव्हान किरण काळे यांनी दिले आहे. छत्रपती शिवरायांची खोटी शपथ घेतली तर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना माफ करणार नाही, असा इशाराही काळेंनी दिला आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने नगर तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये सुरू असणाऱ्या साखळी उपोषणाला काळे यांनी भेट दिली. त्यांनी आंदोलनाला शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पाठिंबा जाहीर केला. यावेळी काळे यांच्यासह ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, इंजिनियर सुजित क्षेत्र आदींसह काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

काळे यावेळी म्हणाले, मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. संयमाची विनाकारण सरकार परीक्षा पाहत आहे. जरांगे पाटलांच्या मागणीची पूर्तता झाली नाही तर राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होईल. सरकारने विनाकारण मराठा बांधवांच्या संयमाला उद्रेकाचे स्वरूप मिळेल, अशा प्रकारचे कृत्य करू नये. छत्रपती शिवरायांची शपथ आपण जाहीर मेळाव्यामध्ये घेतली आहे. मात्र तशी कृती आपण करत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. मी स्वतः मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून तेरा दिवसांचा तुरुंगवास भोगला आहे. त्यावेळी दाखल झालेल्या गुन्ह्यांसाठी मागील बारा वर्षांपासून जास्त काळासाठी न्यायालयामध्ये सर्व आंदोलकांसह मी आजही खेटा मारत आहे, असे ते म्हणाले.

राज्य सरकारच्या अखत्यारीत या विषयाला तांत्रिकदृष्ट्या मर्यादा आहेत. राज्य व केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राज्य विधिमंडळाचे तातडीचे अधिवेशन बोलवावे. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांसह राज्यातील सर्वपक्षीय आमदार, सर्वपक्षीय खासदार यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन संसदेचे तातडीचे विशेष अधिवेशन बोलावून यामध्ये तात्काळ मराठा आरक्षणाचा विषय मंजुर करण्यासाठी दिल्ली गाठत मराठा समाजाला टिकेल असे जरांगेंच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यावे. अन्यथा पुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती आवरता येणार नाही एवढी हाताबाहेर जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.