श्रीक्षेत्र म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात भाविकांची गर्दी

धामणीच्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीला दर्शनासाठी व पाच नामाच्या जागरणासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. पुणे व नगर जिल्हयातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धामणी (ता.आंबेगांव) येथील श्रीक्षेत्र म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात सोमवारी खंडोबाचे दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती.

लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या धामणी येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानाचे मंदिरात देवाचे परंपरागत मानकरी व सेवेकरी तांबे,भगत,वाघे मंडळी यांच्याकडून अभिषेक करण्यात आला. श्री म्हाळसाकांत खंडोबा, म्हाळसाई, बाणाई व उत्तरमुखी खंडोबाची मानलेली बहीण जोगेश्वरी यांच्या मूर्तीना वस्रालंकार चढविण्यात आले. यावेळी धामणी, लोणी, खडकवाडी, गावडेवाडी, महाळूंगे पडवळ, तळेगांव ढमढेरे, अवसरी खुर्द, संविदणे येथील मानकरी,वाघे व वीर मंडळी, व सेवेकरी, ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देवाचे दर्शनासाठी मोठ्या रांगा लागलेल्या दिसत होत्या. चंपाषष्ठीला देवकार्याची पाच नामाची जागरणे करण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केलेली होती. दरवर्षीप्रमाणे चंपाषष्ठी भंडारा उत्सव समितीच्या वतीने लापशी व वांग्याची भाजीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते.