संस्कृती सोहळा – आला श्रावण अलबेला… 

>>लता गुठे 

श्रावण महिन्याची चाहूल लागताच मनात श्रावणी झुले झुलू लागतात. ‘आला आषाढश्रावण, आल्या पावसाच्या सरी, किती चातकचोचीने प्यावा वर्षा ऋतू तरी!’ अशी अवस्था होऊन जाते. तेव्हा माझ्यासारख्या एखाद्या कवयित्रीला ही धरती सती, पार्वती वाटते आणि पाऊस शंकर भोळा. अशा या अद्वैताचा सोहळा पाहताना मनाची अवस्था काय होते ते शब्दांच्या चिमटीत पकडणे शक्य होत नाही. 

प्रत्येक वर्षी श्रावण महिन्याची चाहूल लागताच मनात झुले झुलू लागतात आणि सिमेंटच्या जंगलातून  मन काढता पाय घेत रुळलेल्या पाऊलवाटेने धावत सुटतं. खरं सांगूबालपणही रानफुलासारखंच असतं. थोडय़ा काळाचं सोबती. सर्वात सुंदर, खळखळ वाहणाऱया निरागस झऱयासारखं अवखळ. म्हणूनच कित्येक वर्षे लोटली तरी त्या आठवणी ताज्या राहतात.  

आई चुलीवर ज्वारीच्या लाह्या भाजू लागली की, त्या खरपूस वासाने आजूबाजूचा परिसरही मंत्रमुग्ध व्हायचा. पांढऱयाशुभ्र ज्वारीच्या लाह्याचं ताट पाहायला मस्त वाटायचं. त्यातल्या मूठभर खिशात कोंबायच्या आणि दुसरी मूठ तोंडात टाकत अंगणात पळायची घाई व्हायची. कारण अंगणात झोका खेळायला अनेक मित्रमैत्रिणी आलेले असायचे. मग पाठीमागून आई आवाज द्यायची, “थांब जराकुठे धावतेस? आपल्याला वारुळाला जायचंय नागोबाला पुजायला?” एका ताटात दुधाची वाटी, हळदकुंकू, लाह्या, दिवा, अगरबत्ती असं सगळं सामान घेऊन छान विणलेला रुमाल आई त्यावर टाकायची. तोपर्यंत आजूबाजूच्या शेजारच्या काकू, मावशी, ताई, आजीसगळ्या जमा व्हायच्या आणि ओल्या पायवाटेने उंच वाढलेल्या गवतातून वारुळाच्या दिशेने निघायच्या. वारुळाच्या रस्त्यावर गावाबाहेर मोठ्ठं लिंबाचं झाड होतं. त्या झाडाला अनेक झोके उंच उंच चढताना पाहिले की, एकदा नजर आकाशाकडे आणि पुन्हा जमिनीकडे अशी भिरभिऱयासारखी अनेक झोक्यांवरून फिरायची. तेवढय़ात कोणीतरी गाणं सुरू करायचं आणि तिच्या पाठीमागे इतर बायका गाणं म्हणायच्या. ‘चल गं सये वारुळाला…’  

येताना खूप सारी रानफुलं हातात मावतील तेवढी घेऊन घरी यायचे. त्यांचे हार बनून देवघराला बांधायची. संध्याकाळी जेवण झालं की, गल्लीतील बायका अंगणात यायच्या. मग फेर धरून सुरेख गाणी म्हणायच्या. ‘या ग बायांनो, या गं सयांनो, सांगते तुम्हांस ऐका, श्रीकृष्णाला देवी निघाल्या रंग पहा कैसा…’ पुढचं फारसं आठवत नाही. झिम्मा, फुगडय़ा, उखाणे आणि खळखळून हसणं. तेवढंच काय ते त्यांना मिळालेलं स्वातंत्र्य श्रावण बहाल करायचा.   

श्रावणात एकापाठोपाठ एक येणारे सण असेच उत्साहात साजरे व्हायचे. पिकाने शेतं डवरलेली असायची. त्यामुळे जिकडे तिकडे हर्ष, उल्हास दिसून यायचा. असं हे सर्व वातावरण पाहून कवयित्री शांता शेळके त्यांच्या कवितेतून सांगतात 

चार दिसावर उभा,  

ओला श्रावण झुलवा,  

न्याया पाठवा भावाला,  

हिला माहेरी बोलवा  

असं हे माहेरच्या श्रावणातलं सदैव मनाला वेडावणारं नातं किती सुरेख आहे नाही! ऊनपावसाचा खेळ खेळत श्रावण उंच नभात इंद्रधनुष्य बांधायचा. असा आनंदाचा सोहळा पाहण्यासाठी साक्षात शंकर भगवान सृष्टीवर विसाव्याला येतात असं म्हणतात.  

श्रावणमासीकवितेत ग्रामीण भागातील श्रावण हुबेहूब बालकवींनी चित्रीत केला आहे. ती कविता वाचताना वाटतं की, या धरतीचा सर्वात लुभावना महिना म्हणजे श्रावण. सर्व महिन्यांमध्ये श्रेष्ठ आणि पवित्र मानला जातो ते उगीच नाही.  

श्रावणात पावसाचं रूपडंही वेगळंच जाणवतं. तो धुवांधार कधीच येत नाही. रिमझिमत उघडय़ा रानावनातून सळसळत येतो. युगानुयुगे धरतीचा हा प्रियकर तिचं श्रावणातलं सौंदर्य पाहून हुरळून जातो आणि तिला मनोभावे सजवतो. श्रावणातली सृष्टी प्रत्येक कलाकाराच्या नजरेला भुरळ घालते. मग ती कधी कवितेतून साकार होते, तर कधी चित्रातून व्यक्त होते. माझ्याच कवितेतील काही ओळी 

सखे  श्रावण आला गं, ऋतू साजरा आला गं  

करा उत्सव साजरा, आला श्रावण लाजरा   

ऊन केशरी उटणे लावा, रूप धरेचे प्रियेस दावा  

निंबलोण उतरा गं, सखे श्रावण आला गं  

धरतीचे सौंदर्य पाहण्यासाठी नजरही तितकीच संवेदनशील लागते. डोंगरदऱयांतून झरझर खाली येणारे पांढरेशुभ्र तुषार उधळत कोसळणारे धबधबेते डोळ्यांच्या कॅमेऱयाने टिपताना अशी अवस्था होते की, किती साठवावे!  

सिमेंटच्या जंगलात राहणारी माणसं सौंदर्याचा खजिना लुटण्यासाठी श्रावणात कासच्या पठाराला आवर्जून भेट देतात. अनंत रंगांच्या छटांची असंख्य फुले फुललेली पाहूनआनंदाच्या डोही आनंद तरंगअशी अवस्था होते.  

मला आजही आठवते ती आमच्या गुरुजींनी शिकवलेली कविता. त्या दिवशी आम्ही सारे भारावून गेलो होतो. रिमझिम सरी हलक्याशा बरसत होत्या. आमच्या शाळेच्या पाठीमागे टेकडी होती आणि त्या टेकडीवर एक मंदिर. मंदिराच्या आजूबाजूला मोठमोठय़ा शिळा होत्या आणि समोर शेतात हिरवागार गवताचा गालिचा पसरला होता. तिथे जाऊन श्रावणात आमच्या शिक्षकांनी शिकविलेली कविता अगदी गाऊन. आजही ते शब्द, ते सूर, ते वातावरण डोळ्यांसमोर उभं राहतं. दवाने भिजलेलं लुसलुसणारं गवत पायाला गुदगुल्या करतं आणि वाऱयाच्या झुळकीबरोबर डोलणारी फुलं नि त्याभोवती पिंगा घालणारी पिवळी, निळी फुलपाखरं. ही कविता ऐकली तरी आजही हे सारं सारं डोळय़ासमोर उभं राहतं.   

प्रत्येक वयातला, प्रत्येकाचा श्रावण वेगळा. श्रावणाचं आणि प्रत्येकाचं नातं हे वेगळं. तरीही एक मात्र खरंमनभावन श्रावण कधी प्रियकराच्या रूपात भेटतो, कधी सख्याच्या, कधी कृष्णाच्या बासरीतून बरसतो, तर कधी आठवणी ओलावत पार काळजात घुसतो. तो न भेटताच तिला त्याच्या श्रावणी डोळ्यांत काही खुणा जाणवतात. तारुण्याच्या उंबरठय़ावर भेटलेला श्रावण कवितेतून शब्दांच्या माध्यमातून मोबाइलच्या पीनवर झरू लागतो तेव्हा त्याच्या मनाची उलाघाल वाचता वाचता तिचे डोळे पाणावतात.  

अहो, निसर्गाचे रंग तरी किती! प्रत्येक झाडाच्या पानांचा रंग वेगळा. फुलांच्या गडदफिकट छटा. हे सर्व पाहून एखाद्या कवयित्रीलाही श्रावण चित्रकारच आहे असं वाटतं तेव्हा तिच्या लेखणीतून शब्द कोऱया पानावर निथळतात ते असे 

असा रंगारी श्रावण, रंग उधळीत येतो 

सृष्टीचा तो चित्रकार हिरव्या रंगाने रेखतो 

श्रावण महिन्यातील सण म्हटले की, आनंदाला भरतंच येतं. देवीची पूजा, मंगळागौर, श्रावण सुरू झाल्यावर येणारे श्रावणी सोमवार, महादेवाची पूजा, श्रावण महिन्याची पवित्र माहिती गीतातून, आरतीतून दीपाच्या चैतन्यमय प्रकाशात उजळून निघते. श्रावण महिन्यापासून सर्व हिंदू सण जोरात साजरे व्हायला लागतात.  सोमवार, मंगळागौरीचा उपवास, श्रावणातील पावारी जिवतीची पूजा, नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्णजन्माष्टमी असे अनेक सण एकापाठोपाठ एक लागून येतात आणि याचा उत्सव लहानथोरांना प्रेरित करतो. प्रत्येक सासरी नांदणाऱया मुलीचं माहेराच्या ओढीने मन  होतं  

.दि. माडगूळकर यांच्या एका गाण्याची आठवण झाल्यावाचून राहत नाही.

फांद्यावरी बांधिले गं मुलींनी हिंदोळे   

पंचमीचा सण आला डोळे माझे ओले   

भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सण साजरे केले जातात. श्रावणात येणारे सर्व सण शेती व्यवसायाशी निगडित आहेत. म्हणून ते ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. आपल्या संस्कृतीचा तो वारसा म्हणून जतन केले जातात.  

उत्तर भारतात जन्माष्टमी मोठय़ा आनंदात साजरी करतात आणि सर्व एकत्र येऊन नंदोत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवाला  झुलन जत्रा असेही म्हणतात. म्हणूनच काही ठिकाणी याला दोलोत्सव असेही संबोधले जाते. पौर्णिमेच्या दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात व स्त्रिया त्यांच्यासंबंधी गीते गातात. हा उत्सव एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत चालतो. कृष्णजन्माच्या दुसऱया दिवशी नंदोत्सव करतात. नंदाला पुत्र झाला, असे समजून या दिवशी हळदीकुंकू मिसळलेले पाणी पिचकारीने उडवतात. अशा प्रकारे सण साजरा केला जातो. अशी ही पावसाची अनेक रूपं कवी कुसुमाग्रजांनी त्यांच्या एका कवितेत वर्णन केली आहेत. 

हासरा नाचरा जरासा लाजरा,  

सुंदर साजिरा श्रावण आला,     

तांबुस कोमल पाऊल टाकीत,  

भिजल्या मातीत श्रावण आला 

शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन 

आला श्रावण आलाऋतू अलबेला आला 

(लेखिका कवयित्री, संपादिका, प्रकाशिका आहेत)