सोलापुरात द्राक्षबागांचे नुकसान

शहर व जिह्यात आज सायंकाळी वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. तब्बल पाऊण तास झालेल्या अवकाळी पावसाने नागरिकांसह शेतकऱयांची धावपळ उडाली. या पावसाचा द्राक्ष बागेला प्रचंड फटका बसला. मात्र, उकाडय़ाने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

सोलापुरात दिवसभर प्रचंड उकाडा होता. सायंकाळनंतर वादळी वाऱयाला सुरुवात झाली. रात्री आठच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह धुवांधार पावसाला सुरुवात झाली. तब्बल पाऊणतास सुरू असलेल्या पावसाने शहरातील प्रमुख मार्गासह सखल भागात पाणी साचल्याचे चित्र होते. पाऊस सुरू असताना, शहरातील वीज गायब झाली होती. सोलापूरसह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, पंढरपूर, मोहोळ, माळशिरस तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱयांची तारांबळ उडाली असून, आंबे व द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसला आहे. रात्री उशिरापर्यंत विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होता.