ठसा – अनिल गोरे

>> दुर्गेश आखाडे

कला ही नैसर्गिक देणगी आहे. अशीच देणगी रत्नागिरीतील अनिल गोरे यांना लाभली आहे. कोणत्याही शाळेत किंवा विद्यापीठात कलेचे शिक्षण न घेता त्यांनी अक्षरगणेश ही कला जोपासली आहे. अक्षरगणेश म्हणजे एखाद्या नावाच्या अक्षरामध्ये ते गणपती रेखाटतात. सुरुवातीला आवड म्हणून सुरू केलेली अक्षरगणेश ही कला आज त्यांच्या कुटूंबाचे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे.

शिक्षण झाल्यानंतर काहीतरी कामधंदा हवा म्हणून अनिल गोरे यांनी रत्नागिरीतील धनजी नाका येथील रस्त्यावर पानविक्रीचा व्यवसाय सुरू केला. पानविक्रीचा व्यवसाय हेच त्यांचे त्या वेळी उदरनिर्वाहाचे साधन होते. त्यांच्याकडे रांगोळी काढणे, रंगकाम करण्याची उपजत कला होती. मात्र त्यातून फारसा काही फायदा होत नव्हता. एक दिवस त्यांनी आपल्या मुलाच्या नावाच्या अक्षरातून गणपती काढला. ते चित्र पाहून काहींनी त्यांच्याकडे आपल्या नावाने अक्षरगणेश काढण्याची मागणी केली. रस्त्यावर पाने विकता विकता फावल्या वेळेत कोऱया पानावर त्यांनी अक्षरगणेश रेखाटायला सुरुवात केली. रस्त्यावर विकत असलेल्या खाऊच्या पानापेक्षा ही कोरी पाने त्यांच्यासाठी भविष्य होती. कोऱया पानावर ते अक्षरगणेश रेखाटू लागले. रस्त्यावर बसून हा माणूस काय रेखाटतोय ? हे येणारे जाणारे माणूस पाहत असत. त्यानंतर अनेक जणांनी आपले नाव अनिल गोरे यांच्याकडून रेखाटून घेतले. हळूहळू शहरात त्यांच्या कलेची चर्चा रंगली. 2009 मध्ये आर्ट सर्कल, रत्नागिरीच्या कला प्रदर्शनात त्यांना संधी मिळाली. त्यांच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. प्रदर्शनात अनिल गोरे यांचा अक्षरगणेश पाहण्यासाठी अनेक कलाप्रेमींनी गर्दी केली. पहिल्याच प्रदर्शनात त्यांनी 25 अक्षरगणेश काढून विकले. 2009 ला महाराष्ट्र लघुउद्योग मंडळाच्या संभाजीनगर येथील प्रदर्शनात त्यांना संधी मिळाली. त्या ठिकाणी त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्या प्रदर्शनानंतर आजही संभाजीनगर येथून त्यांना अक्षरगणेशच्या ऑर्डर येतात आणि ते कुरियरने पूर्ण करतात. 2010 साली दिल्ली येथील इंटरनॅशनल ट्रेड फेअर या प्रदर्शनात त्यांची निवड झाली. त्या ठिकाणीही त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर येथील एका प्रदर्शनातही त्यांनी सहभाग घेतला होता.

अनिल गोरे यांची अक्षरगणेश कला लोकप्रिय होऊ लागल्याने ते त्याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहू लागले. त्याकरिता त्यांनी गणपतीपुळय़ाची निवड केली. शनिवार, रविवार आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ते गणपतीपुळय़ात जाऊन समुद्रकिनारी बसून येणाऱया पर्यटकांच्या नावाचे अक्षर गणेश चित्र काढून देऊ लागले. गणपतीपुळय़ात त्यांना चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने फक्त शनिवार आणि रविवार न करता ते दररोज गणपतीपुळय़ात जाऊ लागले. दिवाळी ते मे महिन्यापर्यंत दररोज गणपतीपुळय़ात जाऊन समुद्रकिनारी बसून ते पर्यटकांच्या नावाची अक्षरगणेश चित्रे काढून देतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी, भाऊ आणि मुलगा मदत करतात. केवळ व्यक्तीच्या नावाने नव्हे, तर पंपनीच्या किंवा अन्य कुठल्याही नावाने अक्षरगणेश काढण्याच्या ऑर्डर त्यांना मिळतात. अक्षरगणेशला मिळणारा प्रतिसाद पाहून 1998ला सुरू केलेला खाऊच्या पानाचा व्यवसाय त्यांनी आता बंद केला आहे आणि आता ते पूर्णवेळ अक्षरगणेश चित्रं काढण्यात व्यस्त असतात. अक्षरगणेशच्या फ्रेम करून ते विकतात. लग्न किंवा वाढदिवसाला भेट देण्यासाठी अनेक जण अक्षरगणेशला पसंती देतात.

अनिल गोरे यांनी अनेक मान्यवर व्यक्तींच्या नावाचा अक्षरगणेश काढला आहे. त्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपराष्ट्रपती भैरोसिंग शेखावत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाबामहाराज सातारकर, अभिनेता सचिन पिळगावकर, प्रसाद खांडेकर, मकरंद देशपांडे, वैभव मांगले आणि नम्रता संभेराव या मान्यवर मंडळींच्या नावाचा अक्षरगणेश काढून त्यांना भेट म्हणून दिला आहे. आपली कला केवळ आपल्यापुरती मर्यादित न राहता ती नव्या पिढीकडे जावी याकरिता अनिल गोरे विविध शाळांमध्ये कार्यशाळा घेतात. या कार्यशाळेत अक्षरगणेश शाळा आणि ‘वन स्ट्रोक ग्रीटिंग्ज’ म्हणजेच दीड मिनिटात ग्रीटिंग कसे बनवायचे ते शिकवतात.