केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं! दिल्लीत शेतकऱ्यांच्या मोर्चापूर्वी सार्वजनिक मेळाव्यांवर बंदी, सीमाभागांना छावण्यांचं स्वरुप

शेतकऱ्यांच्या मोर्चामुळे केंद्र सरकारचं टेन्शन वाढलं असून राजधानीतील शांतता आणि सुरक्षेच्या दृष्टीनं दिल्ली पोलिसांनी सोमवारी 12 मार्चपर्यंत सार्वजनिक कार्यक्रमांवर, मेळाव्यांवर बंदी घातली आहे.

दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी जारी केलेल्या आदेशात राजधानीत रॅली आणि ट्रॅक्टरच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली असून शस्त्रे आणि ज्वलनशील पदार्थ तसेच विटा आणि दगड यासारख्या गोष्टींवर तसेच पेट्रोल कॅन किंवा सोड्याच्या बाटल्यांवर पूर्ण बंदी घातली आहे. लाऊडस्पीकरच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.

पिकांसाठी एमएसपी हमी देण्यासाठी कायदा लागू करण्यासह अनेक मागण्या मान्य करण्यासाठी केंद्रावर दबाव आणण्यासाठी शेतकरी 13 फेब्रुवारीला दिल्लीच्या दिशेने मोर्चा काढणार आहेत. ‘दिल्ली चलो’ मोर्चात देशभरातील 200 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होणार असल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाचे नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी केला आहे.

शेतकरी संघटनांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाच्या अगोदर, हरियाणा आणि दिल्लीतील अधिकाऱ्यांनी शेजारील राज्यांच्या सीमेवर काँक्रीट ब्लॉक, रस्त्यावरील स्पाइक अडथळे आणि काटेरी तारा लावून वाहनांना प्रवेश रोखण्यासाठी आणि हजारो पोलीस कर्मचारी तैनात करून त्यांच्या सीमा मजबूत केल्या.

दिल्लीतील सिंघू सीमेवर ड्रोन सज्ज ठेवण्यात आले आहेत. 13 फेब्रुवारी रोजी दिल्लीकडे जाण्यासाठी शेतकरी जमू लागले असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.