प्रासंगिक – मकरसंक्रांतीचे भौगोलिक महत्त्व…

>> प्र. ह. दलाल

मकरसंक्रांत हा इंग्रजी कॅलेंडरनुसार सुरू होणाऱया नववर्षातील पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीत येणारा हिंदूंचा पहिलाच मोठा सण. हिंदू कालगणनेनुसार पौष महिन्यातील शुक्ल पक्षात हा सण येतो. आपण त्यास सण म्हणत असलो तरी तो केवळ आध्यात्मिक सण नाही, तर भौगोलिक व वैज्ञानिकदृष्टय़ाही संपूर्ण मानवजातीसाठी आगळेवेगळे महत्त्व असणारा महत्त्वपूर्ण सण आहे. सामान्यपणे सूर्य सर्वच राशींतून भ्रमण करीत असतो. पण कर्क व मकर राशींतील सूर्याचे संक्रमण विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. हे संक्रमण सहा-सहा महिन्यांच्या अंतराने होते. त्यालाच सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन अशी भौगोलिक नावे आहेत. भारतीय सौर कालगणनेनुसार 1 पौष व इंग्रजी (ग्रेगोरियन) कालगणनेनुसार 22 डिसेंबर रोजी सूर्याचे उत्तरायण सुरू होते.

वर्षाच्या 12 महिन्यांपैकी सहा महिने सूर्य उत्तर गोलार्धात जास्तीत जास्त झुकलेला असतो, तर सहा महिने दक्षिण गोलार्धात. मकरसंक्रांतीपूर्वी सूर्य दक्षिण गोलार्धात जास्तीत जास्त झुकलेला असतो, म्हणजेच उत्तर गोलार्धापासून लांब असतो. परिणामतः उत्तर गोलार्धात सूर्याचा प्रकाश व उष्णता कमी मिळते. दिवस लहान, रात्र मोठी असते. म्हणजेच थंडी जास्त म्हणून हिवाळा असतो. आपला भारत देश उत्तर गोलार्धात आहे. मकरसंक्रांतीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. परिणामतः सूर्यप्रकाश व उष्णता वाढू लागते. दिवस मोठा व रात्र लहान होते, म्हणजेच हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो. ऋतुराज वसंताचे आगमन होणार म्हणून साऱया चराचरात नव चैतन्य संचारते यालाच प्रकाशपर्व असेही म्हणतात. सर्व सजीव सृष्टीत उत्साह व कार्यशक्तीत वाढ होते. जगातील जवळ जवळ 80 टक्के लोकसंख्या उत्तर गोलार्धात राहते. म्हणूनच मकरसंक्रांत हा केवळ धार्मिक सण नाही. तसेच तो फक्त भारतीय लोकांसाठीच नाही, तर जगातील सर्व मानवजातीसाठी उत्साहवर्धक अशी एक भौगोलिक घटना आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ असा उद्घोष करून सूर्याची आराधना करून ‘सर्वे भवंतू सुखिन,’ अशी साऱया विश्वाच्या कल्याणासाठी तेजाची प्रार्थना करणाऱया भारतीय संस्कृतीने अध्यात्माला वैज्ञानिक व भौगोलिक जोड देऊन आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. ही आपल्या दृष्टीने किती अभिमानाची व आनंदाची बाब आहे नाही का? या दिवशी तीळ व गूळ एकमेकांना देण्यामागे आरोग्यवर्धन हा विज्ञानाने मान्य केलेला विचार आहे. त्याबद्दल आपण सर्व चांगले जाणतात.