गुजरातचे अमूल कशाला, महाराष्ट्राचे दूध विकू द्या! दूध विक्रेत्यांनी भाईंदर पालिकेच्या तोंडावर परराज्यातील दूध फेकले

केंद्रासमोर गुडघे टेकत मिंध्यांनी महाराष्ट्रातील महानंदा डेअरी गुजरातच्या घशात घातली असतानाच आता राज्यातील अन्य दूध उत्पादकांना देशोधडीला लावण्याचा डाव आहे. भाईंदर शहरात अमूलसह कर्नाटकचे नंदिनी, हैदराबादचे हेरिटेज हे दूध विकण्यासाठी महापालिका पायघड्या घालत आहेत. याला आक्षेप घेत आज दूध विक्रेत्यांनी आंदोलन केले. गुजरातचे अमूल कशाला? वारणासह महाराष्ट्राचे दूध विकू द्या, अशा जोरदार घोषणा देत पालिकेच्या प्रवेशद्वारावर परराज्यातील दूध फेकले. प्रशासनाने आपले आडमुठे धोरण बदलले नाही तर रस्त्यावर उतरू असा इशारा दूध विक्रेत्यांनी दिला आहे.

भाईंदरमध्ये 93 च्या आसपास दूध विक्रेते आहेत. या ठिकाणी पूर्वी आरे दूध विकले जात होते. मात्र ही विक्री दोन वर्षांपासून बंद असल्याने दूध विक्रेत्यांनी या स्टॉलवर वारणासह राज्यातील अन्य दूध उत्पादक संघांचे दूध विक्री करण्याची परवानगी मागितली आहे, परंतु महापालिका प्रशासन वारणाला जाणीवपूर्वक विरोध करून गुजरातचे अमूल, कर्नाटकचे नंदिनी आणि हैदराबादच्या हेरिटेज या बाहेरील दूध संघांना प्राधान्य देत असल्याचा आरोप स्टॉलधारक संघटनेने केला आहे. या विरोधात आज संघटनेचे अध्यक्ष संजय सावंत व सल्लागार शाम म्हाप्रळकर यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मोर्चेकरांनी दूध केंद्रांवर वारणा दूध व अन्य दुग्धजन्य पदार्थांची विक्री करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. त्याचवेळी पालिकेने परराज्यातील अमूल, नंदिनी, हेरिटेज या दूध संघांचे शिफारस पत्र ग्राह्य धरू नये असे आवाहन केले, परंतु पालिका अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने संतप्त झालेल्या दूध विक्रेत्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर दूध फेकून आंदोलन केले.

अतिरिक्त आयुक्तांची मनमानी
आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर यांना दिले. मात्र मानोरकर यांनी आमच्या पद्धतीनेच काम करू, असे सांगत मुजोरी केल्याची माहिती सावंत यांनी दिली. वारणा महासंघाने पालिकेला रॉयल्टी देण्याची तयारी दाखवली असतानादेखील पालिका यावर निर्णय का घेत नाही, असा सवालदेखील सावंत यांनी केला आहे.