घरच्या मैदानावर खेळण्यासाठी MI चा कॅप्टन हार्दिक पंड्या सज्ज

इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या पर्वासाठी मुंबई इंडियन्स सज्ज झाली आहे आणि तेही नवा कर्णधार हार्दिक पांड्या यांच्या नेतृत्वाखाली. ज्या फ्रँचायझीकडून कारकिर्दीला सुरुवात केली, त्यांच्यासाठी पुन्हा खेळण्यासाठी हार्दिक उत्सुक आहे.

हार्दिकने सोमवारी मुंबईत सीझनपूर्व पत्रकार परिषदेत सांगितले की, “सर्वप्रथम, मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात परत येणे खूप चांगले आहे. मी परत आलो आहे जिथून मी प्रवासाला सुरुवात केली. ही एक अतिशय वास्तविक भावना आहे, कारण 2015 पासून आतापर्यंत मला जे काही मिळाले ते या संघामुळे आहे. 2015 मध्ये जेव्हा मी पदार्पण केले तेव्हा माझे आयुष्य पूर्णपणे बदलले. मी येथे पोहोचलो आणि पहिल्या दिवसापासून माझ्या आवडत्या मैदानावर पुन्हा खेळलो याबद्दल मी खूप आभारी असल्याच्या भावना त्याने यावेळी व्यक्त केल्या.

मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचर आतापर्यंतच्या तयारीवर समाधानी होते आणि इंट्रा स्क्वॉड सराव सामने कसे पूर्ण होतात हे पाहण्यास उत्सुक आहेत. “आम्ही सध्या चांगल्या लयमध्ये आहोत. आमच्याकडे मोठे पथक आहे. आम्ही आज आमचा पहिला सराव सामना खेळणार आहोत. काही युवा खेळाडूंना संघात स्थान मिळवण्यासाठी चांगली कामगिरी करताना मी पाहत आहे आणि ही एक चांगली स्पर्धा आहे,” असे बाऊचर म्हणाले.

मुंबई इंडियन्स रविवारी 24 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध त्यांच्या आयपीएल 2024 मोहिमेला सुरुवात करेल.