वाळवंटी भाग असलेल्या दुबईत जलप्रकोप; शहरे जलमय, विमानेही पाण्यात

वाळवंटी आणि अत्यंत उष्ण हवामान असलेल्या दुबई येथे मंगळवारी मुसळधार पाऊस पडून पूर परिस्थती निर्माण झाली आहे. पावसामुळे तिथले जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरही पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक विमानांचे मार्ग बदलण्यात आले.

विमानतळावर पाणी भरल्याने अनेक विमाने वळवण्यात आली.. दुबई विमानळावर संध्याकाळी साधारणपणे 100 विमाने येतात. मात्र पूरामुळे जी परिस्थिती आहे, त्यामुळे विमाने वळविण्यात आली आहेत. मात्र अर्ध्या तासानंतर हळूहळू विमानसेवा पुन्हा सुरु झाली होती. मुसळधार पावसामुळे विमानाच्या उड्डाणांने रद्द करण्यात आली. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये धावपट्टी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे दिसून येते. विमानतळाचे पार्किंगही अर्धवट पाण्यात बुडाले आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही पाणी साचल्याचे दिसून आले. दुबई शॉपिंग मॉलमध्येही गुडघाभर पाणी भरले आहे.

मुसळधार पावसामुळे दुबईतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, विविध घरांची छत, दारे आणि खिडक्यांमधून पाणी शिरू लागले आहे. वादळाचा प्रभाव दुबईच्या पलीकडे पसरला आहे. संपूर्ण संयुक्त अरब अमिरातीबरोबरच शेजारचा देश बहारीनही पुरात बुडाला आहे. सध्याची परिस्थिती पाहता युएईमध्ये शाळा बंद करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, ओमानमध्ये पाऊस आणि वादळामुळे आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. वादळामुळे बहरीनमधील परिस्थितीही बिकट झाली आहे.