हा ठरला मुंबईतील गेल्या 15 वर्षांतील सर्वात उष्ण दिवस

राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 अंशावर गेला असून मंगळवारी मुंबई देखील 40 अंशावर पोहोचली होती. मुंबईचे कमाल तापमान 39.7 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. 2009 पासून एप्रिलमधील सर्वात उष्ण दिवस ठरला, असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले.

16 एप्रिल रोजी सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान 39.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा वेधशाळेने 35.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवले. 15 वर्षांपूर्वी म्हणजेच 2 एप्रिल 2009 रोजी मुंबईतील तापमान 40.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. त्यानंतर 16 एप्रिल 2024 मध्ये सर्वाधिक तापमान नोंदवले गेले.

गेले तीन दिवस IMD ने मुंबई आणि शेजारील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. ठाणे, रायगड जिल्ह्यातील काही भागांमध्ये 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले.

बुधवारी तापमानात घट झालेली पाहावयास मिळाली. मात्र वाढलेल्या आर्द्रेतेमुळे मुंबईकरांना चांगलाच घाम फुटला होता. कुलाबा व सांताक्रुझ वेधशाळांमध्ये अनुक्रमे 78 टक्के आणि 71 टक्के सापेक्ष आर्द्रता नोंदवली गेली.