ठसा – अशोक मुळे

>> ज्योती निसळ

डिंपल प्रकाशनला 26 जानेवारी 2024 रोजी 50वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने…

अशोक मुळे यांचा जन्म मुंबईचा. त्यांचे वडील नारायणराव हे बॉम्बे डाईंगमध्ये कामाला होते. आई मात्र घर सांभाळणारी, घराचा तोल सावरणारी गृहिणी. त्यांचे प्राथमिक शिक्षण महापालिकेतील शाळेतच झाले. नंतरचे शिक्षण मात्र त्यांनी प्रार्थना समाज विद्यालयातून पूर्ण केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यामुळे आपणही घराला काहीतरी आर्थिक हातभार लावावा असे त्यांच्या बालमनाने घेतले आणि त्यांनी आठवीत असतानाच घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले. तेही आपला अभ्यास सांभाळून. नववीत असताना त्यांनी केदार वाचनालयात अर्धवेळ नोकरी करायला सुरुवात केली. आपले काम सांभाळून लायब्ररीत पुस्तकं वाचण्याचा त्यांना जणू छंदच लागला आणि तेथूनच त्यांच्या मनात साहित्याचे बीज रोवले गेले.

तशातच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ‘मराठी माणसाने उद्योजक बनावे, नोकरी मागणाऱयापेक्षा नोकरी देणारे बनावे’ हे वाक्यही त्यांच्या मनात रिंगण घालतच होते. त्यांच्या मनाने दृढनिश्चय केला की, आपणही आपला काहीतरी व्यवसाय सुरू करावा आणि त्यांनी 26 जानेवारी 1975 ला प्रकाशन व्यवसायात पहिलं पाऊल टाकलं. ना पैशाचं पाठबळ होतं…ना कुठली प्रकाशनाची पार्श्वभूमी. तरीही हे धाडस त्यांनी केलं आणि मीरा प्रकाशनची निर्मिती झाली. त्यांनी पहिली कादंबरी ‘गमभन’ प्रकाशित केली, तीही नाटककार सुरेश चिखले यांची आणि सुरू झाला त्यांचा प्रकाशनाचा अखंड प्रवास.

त्यांनी मीरा प्रकाशनचे नाव डिंपल प्रकाशन असे ठेवले ते केव्हा आणि का? असं त्यांना विचारताच ते मिश्कील हसत म्हणाले, लग्नानंतर. त्या वेळेला अभिनेत्री डिंपलचा ‘बॉबी’ हा चित्रपट खूप गाजत होता. आपलंही प्रकाशन असंच गाजावं या हेतूने डिंपल प्रकाशन हे व्यावसायिक नाव धारण केलं. त्यांच्या या प्रकाशनाच्या वाटचालीत माननीय दिलीप वेसावकर, प्रकाश विश्वासराव, चंद्रकांत धर्माधिकारी, भारत तांडेल, प्रदीप कर्णिक, सुनील कर्णिक, बियन चव्हाण, विजय तेंडुलकर, नारायण सुर्वे, दुर्गा भागवत, भाऊ पाध्ये, केशव मेश्राम, माधव गडकरी, आनंदीबाई विजापुरे, शिरीष पै, राजेंद्र पै, सतीश दुभाषी, वसंत शिरवाडकर, सुशीलकुमार शिंदे, शशी भालेकर, दिवाकर गंधे, संदेश जाधव, गंगाराम गवाणकर, चंद्रकांत खोत, अशोक बागवे, अशोक नायगावकर, अशोक चिटणीस, शुभा चिटणीस, महेश केळुसकर, अरुण म्हात्रे, विवेक पंडित, उषा मेहता, गणेश चंदनशिवे, प्रकाश खांडगे, नंदा मेश्राम, माधवी कुंटे, इंद्रायणी सावकार…या आणि अशा अनेक मान्यवरांचा पाठिंबा मिळत गेला आणि त्यातील अनेक नामवंतांची पुस्तकेही त्यांनी प्रकाशित केली. त्यांच्या प्रकाशनाच्या यशाचा वेलू हळूहळू गगनावरी लहरू लागला.

माझ्याही पाच पुस्तकांचे प्रकाशन प्रकाशक अशोक मुळे आणि प्रकाशिका नम्रता मुळे यांनी केलं. संदेश जाधव यांनी सुचविलेल्या संत साईबाबांवर लिहिलेल्या ‘श्री साई उत्सव गाथा’ आणि भारतीय चित्रपटाचे जनक माननीय दादासाहेब फाळके यांच्यावर लिहिलेल्या ‘ध्येयस्थ श्वास’ या पुस्तकांना वाचकांची विशेष पसंती मिळाली. अगदी लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या वाचकांचीसुद्धा ! हे मला लंडनच्या महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा माननीय श्यामल पितळे यांनीच कळविले. ‘ध्येयस्थ श्वास’ या पुस्तकामुळेच फिल्म सिटीत जाऊन दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचे भाग्य मला लाभले हे मुळे दांपत्याचे ऋण मी कदापिही विसरू शकणार नाही. अर्थात अशोक मुळे यांच्या यशामध्ये त्यांच्या पत्नी नम्रता मुळे आणि मुलं कौतुक, कौस्तुभ, त्यांच्या सुना या सगळ्यांचाच वाटा आहे. अशोक मुळे यांचा मित्रपरिवारही अफाट आहे आणि तोही आपुलकीच्या धाग्याने घट्ट घट्ट विणलेला. अशोक मुळे साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे प्रमुख विश्वस्त आणि कार्याध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रम त्यामार्फत ते राबवत असतात. नुकतेच 19वे जागतिक मराठी संमेलन विरारमध्ये आयोजित करण्यात आले होते. हे संमेलन यशस्वी करण्यामध्ये अशोक मुळे यांचे मोलाचे सहकार्य होते. पन्नास वर्षें सतत सातत्याने प्रकाशन करणे, हजार पुस्तक- प्रकाशनाचे ध्येय गाठणे आणि तेही यशस्वीपणे हे अशोक मुळे यांनी सिद्ध करून दाखविलेले आहे.