आंबेगाव तालुक्यात पुन्हा बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रुक येथील वेताळ मळा व परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने पिंजरा लावत बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सध्या सर्वत्र ऊस तोडणी हंगाम सुरू असल्यामुळे उसाची तोड सुरू झाली आहे. त्यामुळे बिबट्यांचा रहिवास नष्ट होत असल्याने ते आता रस्त्यावर येत आहेत. वेताळ मळ्यातील वेताळ मंदिराजवळ सायंकाळी 6 वाजता अनिल थोरात व प्रतीक थोरात हे चारचाकी वाहनातून कळंबकडून चांडोलीकडे जात होते. त्यावेळी त्यांना दोन बिबटे रस्त्यावर बसलेले दिसले. प्रसंगावधान राखत त्यांनी गाडी थांबवली आणि हॉर्न वाजवला. त्यानंतर बिबटे उसाच्या शेतात निघून गेले.

पुढे गेल्यावर वेताळ मळ्यातील वेशीजवळ त्यांना पुन्हा दोन बिबटे रस्ता ओलांडताना दिसले. यापरिसारत एकूण चार बिबटे असण्याची शक्यता आहे. तसेच आता त्यांचा वावर वाढल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण आहे. याआधी बिबट्यांनी दुचाकी स्वारांवर अनेक वेळा हल्ले केले होते. बिबटे आता चांडोली हद्दीमध्ये ठाण मांडून आहेत. शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकाला पाणी देण्यासाठी शेतात या रस्त्याने जावे लागते. त्यामुळे बिबट्यांचा हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.