महायुतीतील जागावाटपाचा तिढा; दिल्लीपासून मुंबईपर्यंतच्या भाजप नेत्यांची डोकेदुखी वाढली

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपासाठी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानापासून मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर जोरबैठकांचा सिलसिला सुरू आहे, पण तरीही भाजपमधील व महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटत नाही. बारामती, माढा, अमरावती, सोलापूरमधील जागावाटपाचा तिढा सुटत नसल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

महायुतीमध्ये जागावाटवाटपारून एकीकडे राडा सुरू आहे तर दुसरीकडे भाजपमध्येही तीच परिस्थिती आहे. परिणामी महायुतीमधील संघर्ष टोकाला जात आहे. भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि माढामधील जागेवरून संघर्षाला सुरवात झाली. माढामध्ये भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली, पण त्यांच्या उमेदवारीला रामराजे निंबाळकर आणि मोहिते-पाटील गटाकडून विरोध सुरू झाला. या मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

बारामती मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाली, पण त्याचवेळेस विजय शिवतारे यांनी बंडाचे निशाण फडकवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांना मुंबईत बोलावून त्यांची कानउघाडणी केली, पण तरीही विजय शिवतारे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांनीही अजित पवार यांच्या विरोधात पवित्रा घेतला आहे. त्यामुळे महायुतीमधील बेबनाव पुढे आला आहे. तीच परिस्थिती अमरावतीमध्ये आहे. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना उमेदवारी देण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. नवनीत राणा यांना कमळ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवण्याचे भाजप नेत्यांचे प्रयत्न आहेत, पण अमरावतीमधील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी नवनीत राणा यांना कमळ चिन्ह देण्यास विरोध केला आहे.

उदयनराजेंच्या मनधरणीसाठी फडणवीसांची दिल्लीत पळापळ

साताऱयाची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले उदयनराजे भोसले गेल्या 72 तासांपासून अमित शहांच्या भेटीसाठी ताटकळले आहेत. शहांची भेट होत नसल्याने राजे नाराज असल्याचे कळताच भाजपच्या पोटात भीतीचा गोळा उठला. जागावाटपासाठी दिल्लीत गेलेल्या महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी चर्चा सोडून राजेंचा बंगला गाठला आणि त्यांची मनधरणी केली.